घोरपडी, एरंडवणा, कोथरूड घरांसाठी सर्वाधिक महागडे
By admin | Published: December 26, 2014 04:56 AM2014-12-26T04:56:41+5:302014-12-26T04:56:41+5:30
शहराच्या विविध भागांत सदनिकांचे दर गगनाला भिडले असतानाच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात सरासरी
पुणे : शहराच्या विविध भागांत सदनिकांचे दर गगनाला भिडले असतानाच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात सरासरी २० टक्के दरवाढीची शिफारस केली आहे. ही दरवाढ मंजूर झाल्यास १ जानेवारी २०१५ पासून घरांच्या किमती अधिक महागणार आहेत. या प्रस्तावित दरवाढीत घोरपडी परिसरातील सदनिका शहरात सर्वांधिक महाग असणार आहेत. घोरपडी परिसरात प्रतिचौरस फूट १२ हजार ९१५ रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने गेल्या एक-दोन वर्षांतील सदनिका व अन्य मिळकतीचा खरेदी-विक्री व्यवहार लक्षात घेऊन रेडीरेकेनरचे दर निश्चित करण्यात येतात. यासाठी शहराचे ५५ विभाग (झोन) तयार करण्यात आले आहेत. त्या विभागातील मोकळ्या जागा आणि सदनिकांचे कमाल व किमान दर सुचविण्यात आले आहेत. घोरपडीपाठोपाठ एरंडवणा आणि कोथरूडने त्यानंतर क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये घोरपडी परिसरासाठी १२ हजार ९१५, एरंडवणा ११ हजार ८९२, कोथरूड १० हजार २९६ प्रतिचौरस फूट दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरात सर्वांत कमी दर ३ हजार ६०३ चौरसफूट दर शिवणे परिसरात आहे. तर मोकळ्या जागांमध्ये सदाशिव, नारायण पेठ परिसरात सर्वांधिक दर सुचविण्यात आले आहेत. नारायण पेठेत दर प्रतिचौरस फुटासाठी ८ हजार २४८ रुपये आणि सदाशिव-नवी पेठेत ७ हजार ८१५ , बुधवार पेठ परिसरात ७ हजार ६२८ दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
मुद्रांक विभागाने गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेडीरेकनरमध्ये सरासरी २० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. परंतु बांधकाम व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधीने या दरवाढीला विरोध केला असून, ही दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. येत्या १ जानेवारी २०१५ पासून रेडीरेकनरचे दर लागू होणार आहेत.(प्रतिनिधी)