संशयाचे भूत डोक्यात शिरले; पत्नीचा कायमचा काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 05:45 PM2024-01-02T17:45:32+5:302024-01-02T17:45:51+5:30
पती - पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते
किरण शिंदे
पुणे : संशयाचे भूत डोक्यात शिरल्यानंतर संसाराची राख रांगोळी ठरलेलीच आहे. पुणे शहरातूनही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून करण्यात आला आहे. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संभा कॉलनी परिसरात ही घटना घडली. पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. भल्या पहाटे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उमा ऊर्फ पपूजा लखन कांबळे (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती लखन कांबळे (वय २८) याला ताब्यात घेण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे दांपत्य धाराशीव जिल्ह्यातील कळंबचे रहिवाशी. पोटाची खळगी भरण्यासाठी ते पुण्यात आले होते. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करत होते. परंतु, सध्या लखन काहीच काम करीत नव्हता. लखन याला उमाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. मंगळवारी सकाळी देखील त्यांच्यात यावरून वाद झाले. त्याने रागाच्या भरात कुऱ्हाड घेऊन उमा हिच्यावर वार करायला सुरुवात केली. कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना स्थानिकांनी माहिती कळवली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.