जायंट किलर 'दत्तामामा' झाले राज्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 06:28 PM2019-12-30T18:28:31+5:302019-12-30T18:30:55+5:30
संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला नमवणारे नेते ठरले असले तरी मतदारसंघात मात्र ते 'दत्तामामा' म्हणूनच ओळखले जातात.
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात काही व्यक्तींच्या नावांना जोडलेली नाती हा त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला आपलेपणा दाखवतात ताई, दादा, काकी, भैय्या, बाळासाहेब आणि आता त्यातलं नवीन नाव म्हणजे दत्तात्रय भरणे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला नमवणारे नेते ठरले असले तरी मतदारसंघात मात्र ते 'दत्तामामा' म्हणूनच ओळखले जातात.
बारामतीच्या शेजारच्या इंदापूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झालेल्या भरणे यांची कारकीर्द कधीच सोपी नव्हती. त्यांच्यासमोर हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे मोठे आव्हान तेव्हाही होते आणि पुढेही असणार आहे. भरणे तसे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. बी कॉमपर्यंत शिकलेल्या भरणे यांना आमदार बनवण्यात दादांचा मोठा वाटा असला तरी भरणे यांची मेहनतही आहे. जिल्हा बँक, साखर कारखाना आणि त्यानंतर थेट पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देऊन पवार यांनी त्याला बळ दिले. भरणे यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करत इंदापूरमधील प्रत्येक गावाशी संपर्क ठेवला, कार्यकर्ते निर्माण केले आणि प्रत्येक कार्याला घरोघरी भेटीही दिल्या. भरणे यांची पायाभरणी सुरु असलेल्या काळातच पाटील यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे गावोगावी फिरणे शक्य झाले नाही आणि त्याचा झटका त्यांना २०१४साली बसला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले तरी पाटील पडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण भरणे यांनी अंदाज फिरवला आणि आमदारकी पटकवली.
२०१९साली आघाडी झाल्यावर भरणे यांनी जागा सोडण्याची तयारी दाखवली होती मात्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तो विषय संपला. त्यामुळे दुसऱ्यांदा ते लढले. अर्थात त्यांना २०१४ ते २०१९च्या काळात जपलेले संबंध आणि जनसंपर्क यांचा फायदा झाला. आणि पुन्हा एकदा राज्यात ते जायंट किलर ठरले. सर्वसाधारणपणे प्रादेशिक समतोल राखण्यासाठी अगदी शेजारच्या मतदारसंघातल्या व्यक्तींना मंत्रीपदे दिली जात नाहीत. त्यामुळे बारामतीतून अजित पवार यांचे नाव निश्चित असल्यामुळे भरणे यांच्या नावावर साशंकता होती. पण खुद्द शरद पवार यांनी आपल्या या लढवैय्या कार्यकर्त्याची निवड केल्याचे समजते. भरणेमामा हे मतदारसंघाप्रमाणेच राज्यातल्या जनतेच्या मनातही आपले विशेष स्थान निर्माण करतील अशी आशा आहे.