महाकाय रेडिओ दुर्बिणीने टिपले सूर्यावरील सूक्ष्म चुंबकीय विस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 05:28 AM2020-06-03T05:28:11+5:302020-06-03T05:28:38+5:30
जागतिक नोंद : पहिल्यांदाच भारतीय खगोल संशोधकांचे मिळाले यश, गोलाकार रिंगमधील उर्जेचे रहस्य उलगडले
अशोक खरात ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद (जि. पुणे): सूर्य हा सर्व जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर अनेक स्फोट होत असतात. त्यातून मोठी ऊर्जा प्रसारित होते. सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाºया सूक्ष्म रेडिओ चुंबकीय प्रकाशझोतांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या गटाने मर्चिसन वाइल्डफिल्ड एक्सरे (एमडब्लूए) या दुर्बिणीतून घेतलेली माहिती आणि पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओअॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या साहाय्याने हा शोध लावण्यात आला.
सूर्याच्या स्फोटांचा अभ्यास जगभरातले शास्त्रज्ञ करत आहेत. या स्फोटांवर जीवसृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे. सूर्यावरील चुंबकीय विस्फोटाच्या धूम्र लाटांचा शोध ‘एनसीआरए’तील शास्त्रज्ञ प्रा. दिव्य ओबेरॉय त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करणारे विद्यार्थी सुरजित मोंडल व पूर्व पीएच.डी. विद्यार्थी डॉ. अतुल मोहन या संशोधकांचा गट काही दिवसांपासून घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)चे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी ‘लोकमत’ला दिली.
सूर्यावरील तापमान अंदाजे साडेपाच हजार अंश सेल्सिअस इतके प्रचंड असते. या पृष्ठभागावर तब्बल २० लाख अंश सेल्सिअस तापमानाचा, म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही साडेतीनशे पट जास्त तप्त असणाºया उष्ण वायूचा एक थर असतो. या थराची झलक संपूर्ण सूर्यग्रहणादरम्यान (खग्रास सूर्यग्रहण) पृथ्वीवरून पाहता येते.
रहस्यमय प्रक्रियेचा झाला उलगडा
सूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्राची ताकद एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी साधारणपणे हजारपेक्षा अधिक पटीने बदलत असते. सूर्यावरील करोना (गोलाकार रिंग) उष्ण आहे. ही उष्णता निर्मिती प्रक्रिया सूर्याच्या या गोलाकार पृष्ठभागावर समान पद्धतीने होते.
अगदी सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील कमकुवत क्षेत्रांमध्येदेखील. आतापर्यंत ही चुंबकीय ऊर्जा करोनामध्ये कशी साठवली जाते, याची प्रक्रिया एक रहस्य राहिलेली होती. मात्र, त्याचा आता उलगडा झाला आहे.
सूर्याच्या पृष्ठभागावरील स्फोटांमुळे उत्सर्जित झालेले अॅ-रे आणि अतिनील किरणे शोधण्यासाठी यापूर्वी बरेच प्रयत्न केले गेले. पण एकदाही यश मिळाले नव्हते.
- सुरजित मंडल, शास्त्रज्ञ, संशोधन कार्याचे प्रमुख लेखक