ही तर लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची भेट

By admin | Published: May 3, 2017 02:55 AM2017-05-03T02:55:44+5:302017-05-03T02:55:44+5:30

खरंतर सौभाग्यलेणं परत मिळेल याची आशाच सोडली होती. पोलीस आश्वासित करीत होते आणि उमेद वाढवून सहकार्यही करीत होते

This is the gift of the Golden Jubilee Year of marriage | ही तर लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची भेट

ही तर लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची भेट

Next

पुणे : खरंतर सौभाग्यलेणं परत मिळेल याची आशाच सोडली होती. पोलीस आश्वासित करीत होते आणि उमेद वाढवून सहकार्यही करीत होते...लग्नाचा नुकताच पन्नासावा वाढदिवस झाला आणि आज पोलिसांकडून सौभाग्यलेणं परत मिळून जणू एक अमूल्य भेटच मिळाली..सराईत गुन्हेगारांनी चोरून नेलेले आपले सोन्याचे दागिने आनंदाने परत घेताना ज्येष्ठ महिला भावुक झाली होती.
शहरातील ३५ गुन्ह्यातील ३ किलो ४०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि ३१ किलो ६१२ ग्रॅमचे चांदीचे दागिने असा ९१ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देसूद माल पुन:प्रदानाच्या कार्यक्रमात महिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
निर्मला फाटक म्हणाल्या की, २ डिसेंबर २०१६ ला कोयत्याचा धाक दाखवून चोरांनी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. घरी येऊन १०० क्रमांकाला फोन केला तेव्हा वारजे, डहाणूकर कॉलनी आणि कोथरूड अशा तिन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी माझ्याकडून माहिती घेऊन गेले. मंगळसूत्र परत मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले आणि ४-५ दिवसांत मंगळसूत्र ताब्यात मिळाल्याचा फोन आला.
समारंभात सन्मानपूर्वक ते परत देण्याचा उपक्रम अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. (प्रतिनिधी)

सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याचा अपार आनंद

विजया कुलकर्णी यांनी लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगळसूत्र परत देऊन एक अनोखी भेट दिली असल्याची भावना व्यक्त केली. सोन्याचे दागिने कधी घालत नाही; मात्र खंडाष्टमी म्हणून सोन्याचे मंगळसूत्र घालून बाहेर पडले आणि कोणी कधी ते चोरले हे कळलेदेखील नाही. डहाणूकर पोलीस चौकीला जाऊन तक्रार दिली. आज सौभाग्यलेणं परत मिळाल्याचा अपार आनंद होत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडताना दागिन्यांचा मोह टाळावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मंगळसूत्र परत मिळण्याची आशाच नव्हती. मात्र, आज ते परत मिळाल्यामुळे पोलिसांकडून भाऊबीज मिळाली असल्याचे माणिक दीक्षित यांनी सांगितले.

...नाहीतर मुद्देमाल परत घेऊ
पुणे : सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल परत मिळाला म्हणजे तुमचे काम संपलेले नाही. आरोपींविरुद्ध न्यायालयात साक्ष द्यायची आहे, हे लक्षात ठेवा. समन्स निघतील तेव्हा साक्ष द्यायला नक्की या, नाहीतर मुद्देमाल परत घेऊ, अशी मिश्कील टिप्पणी करीत राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी उपस्थितांना कर्तव्याची जाणीव करून दिली.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेले दरोडे, साखळीचोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांतील चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने पोलीस ठाण्यांचे, तसेच गुन्हे शाखेकडील पोलिसांनी हस्तगत केले, तो मुद्देमाल पुन:प्रदानाचा कार्यक्रम माथूर यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून व पोलीस कल्याण निधीतून शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या हिरकणी बहुउद्देशीय संकुल, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर आणि अद्ययावत व्यायामशाळेचे उद्घाटनही करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदीप देशपांडे आणि अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग शशिकांत शिंदे उपस्थित होते.

Web Title: This is the gift of the Golden Jubilee Year of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.