गिरिप्रेमीच्या गिर्याराेहकाने फडकवला माउंट कांग यात्से II शिखरावर तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:13 PM2019-08-08T21:13:39+5:302019-08-08T21:18:18+5:30
गिरिप्रेमी या गिर्याराेहन संस्थेचा गिर्याराेहक वरुण भागवत याने लेह- कारगील भागातील मरखा व्हॅली येथे स्थित कांग यात्से II या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.
पुणे : गिरिप्रेमी गिर्याराेहण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राेवला गेला आला आहे. संस्थेचा गिर्याराेहक वरुण भागवत याने लेह- कारगील भागातील मरखा व्हॅली येथे स्थित कांग यात्से II या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. ६३०० मीटर उंचीवर स्थित असलेल्या या शिखरावर ३१ जुलैला सकाळी साडे आठच्या सुमारास शिखरावर भारतीय तिरंगा फडकाविला.
वरुण समवेत रोहन देसाई व ऋतुराज आगवणे असा तीन जणांचा संघ ३६ जुलै रोजी मोहिमेसाठी रवाना झाला होता. २७ ते ३० जुलै असे चार दिवस ट्रेक करत संघ कांग यात्से शिखराच्या बेस कॅम्पला पोहोचला. बेसकॅम्पहून मध्यरात्री १२ ला अंतिम शिखर चढाईला सुरवात करत वरुण पहाटे शिखर माथ्यावर पोहोचला. रोहन अंतिम शिखर चढाई करताना शिखरमाथ्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर छोटा अपघात झाल्याने मोहीम अर्धवट सोडून परतावे लागले. तर ऋतुराज बेस कॅम्प चढाई दरम्यान आजारी पडल्याने मोहीम थांबवावी लागली. वरुणने मात्र गिर्यारोहणाची सर्व कौशल्ये पणाला लाऊन शिखर चढाई यशस्वी केली. कांग यात्से शिखरावरून दिसणारे दृश्य विहंगम असून माउंट नून- कून सहित उत्तरेला असणारे माउंट के२ या शिखरांचे दर्शन होते. गिरिप्रेमीची मोहीम खास नवोदित गिर्यारोहकांची मोहीम होती. या मोहिमेच्या संघाला श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक श्री. उमेश झिरपे यांनी मार्गदर्शन केले.