गिरीप्रेमीचे पथक माऊंट मंदा-१ मोहिमेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:06+5:302021-08-17T04:17:06+5:30
पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त गिरिप्रेमीच्या ‘माऊंट मंदा-१’ या गिर्यारोहण मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम झाला. ‘आरडी अँड ई, डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुळकर ...
पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त गिरिप्रेमीच्या ‘माऊंट मंदा-१’ या गिर्यारोहण मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम झाला. ‘आरडी अँड ई, डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुळकर यांच्या हस्ते मोहिमेच्या संघाला भारतीय ध्वज प्रदान करण्यात आला. या मोहिमेसाठी डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, पवन हडोळे, अंकित सोहोनी, वरुण भागवत, रोहन देसाई, ऋतुराज आगवणे व निकुंज शाह यांचा समावेश असलेले पथक सज्ज झाले आहे. या अनुभवी व निष्णात गिर्यारोहण संघाचे नेतृत्व आनंद माळी करणार आहेत.
या वेळी कुरुळकर यांच्यासमवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा महामंडळाचे संचालक डॉ. दीपक माने, निवृत्त हवालदार मेजर बजरंग निंबाळकर, क्युबिक्स मायक्रोसिस्टिम्सचे संचालक विजय जोशी, विद्या व्हॅली प्रशालेचे संचालक विवेक गुप्ता, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे उपस्थित होते.
कुरुळकर म्हणाले, “गिरिप्रेमीच्या मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्यदिनी माझ्या हस्ते होणे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.”
निवृत्त मेजर हवालदार निंबाळकर म्हणाले, “मी अनेक वर्षे हिमालयात तैनात होतो. तेथील आव्हानांची मला जाणीव आहे. हिमालयाला आव्हान देऊन जमत नाही. त्याच्यावर प्रेम करून, त्याला आपलंसं करून वागलं तरच हिमालयदेखील आपल्याला साथ देतो. गिरिप्रेमीच्या नावातच पर्वतांवर प्रेम करण्याचे संस्कार आहेत. त्यामुळे या मोहिमेला नक्की यश मिळेल.”
मोहिमेबद्दल माहिती देताना उमेश झिरपे म्हणाले, “गंगोत्री हिमालयातील माऊंट मंदा-१ हे शिखर चढाईच्या दृष्टीने अत्यंत कठीण आहे. या शिखरावर आजपर्यंत एकही भारतीय मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. गिरिप्रेमीच्या संघांनी १९८९ ते १९९१ असे दोन वेळा या शिखरावर चढाईचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा यश मिळाले नाही. आता गिरिप्रेमीच्या कसलेल्या गिर्यारोहकांचा संघ माऊंट मंदाचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे. या वेळी गिर्यारोहकांची तयारी जोरदार आहे. संघात अनुभवी व ताज्या दमाच्या गिर्यारोहकांचा मिलाफ आहे. संघाची दोन वर्षांपासून कसून तयारी सुरू आहे. त्यामुळे माऊंट मंदावर या वेळी तिरंगा नक्कीच फडकणार, याची मला खात्री आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एव्हरेस्टवीर गणेश मोरे यांनी केले, तर आभार एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांनी मानले.
गिर्यारोहकांचा कस
माऊंट मंदा हा शिखर समूह गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात गोमुखजवळ वसलेला आहे. या शिखर समूहातील पहिले शिखर माऊंट मंदा-१ (उंची ६५२९ मीटर) वर सप्टेंबर महिन्यात गिरिप्रेमीचा संघ केदारकंठ व्हॅलीतील पश्चिम बाजूने शिखराच्या उत्तर धारेने चढाई करणार आहेत. मंदा-१ शिखर चढाई मार्ग हा अंगावर येणाऱ्या ९० अंश कोनातील खड्या चढण व सोबतीला गिर्यारोहकांचा कस पाहणाऱ्या मोरेनसारख्या भूभागांनी व्यापलेला आहे. गिर्यारोहकांना कौशल्ये पणाला लावून चढाई करावी लागणार आहे.
फोटो - माऊंट मंदा