गिरीश बापटांना कसब्याची काळजी, निवडणुकीसाठी त्यांनी मला टिप्सही दिल्या - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 19:59 IST2023-02-15T19:55:19+5:302023-02-15T19:59:41+5:30
कसबा आणि चिंचवड या दोन्हीही ठिकाणी भारतीय जनता पार्टी नीटपणे निवडून येईल, फडणवीस यांचा आत्मविश्वास

गिरीश बापटांना कसब्याची काळजी, निवडणुकीसाठी त्यांनी मला टिप्सही दिल्या - देवेंद्र फडणवीस
पुणे/किरण शिंदे : गिरीश बापट आमचे नेते आहेत. कसबा विधानसभा निवडणुकीची त्यांनाही काळजी आहे. या निवडणुकीवर त्यांचे अतिशय बारकाईने लक्ष आहेत. त्यांनी या निवडणुकीसंदर्भात मला काही टिप्स दिल्या आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट नाराज असल्याच्या चर्चा धुडकावून लावल्या. आजारी असलेल्या गिरीश बापट यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश बापट आमचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी यापूर्वी अनेकदा मी आलो होतो. आजही त्यांची भेट घेतली आहे. मागील वेळेस पेक्षा यावेळेस त्यांची प्रकृती चांगली आहे आणि याचा मला जास्त आनंद आहे. कसबा विधानसभा निवडणुकीची त्यांनाही काळजी आहे. या निवडणुकीत संदर्भात त्यांनी मला आज काही सूचना दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट यांचे कुटुंबीय या निवडणुकीच्या कामासाठी लागले आहेत. आजारी असतानाही कसबा निवडणूकीकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्हीही ठिकाणी भारतीय जनता पार्टी नीटपणे निवडून येईल असा आत्मविश्वास देखील फडणवीस यांनी बोलून दाखवला.