गणेश उत्सव वितरण समारंभात गिरीश बापट म्हणाले, मन परिवर्तन ही बाप्पाची कृपा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:58 AM2018-08-25T00:58:01+5:302018-08-25T00:58:23+5:30
गणेशोत्सव संस्काराचा व समाजाचा उत्सव आहे. अशिक्षितांपासून सुशिक्षित, चांगल्या कामासाठी व वाईट काम बंद करण्याची प्रेरणा बाप्पांकडून मिळते. माणसांचे मनपरिवर्तन बाप्पांची कृपा आहे. पूर्वी गणेशोत्सवात लोकसहभाग कमी प्रमाणात होता.
पिंपळे गुरव : गणेशोत्सव संस्काराचा व समाजाचा उत्सव आहे. अशिक्षितांपासून सुशिक्षित, चांगल्या कामासाठी व वाईट काम बंद करण्याची प्रेरणा बाप्पांकडून मिळते. माणसांचे मनपरिवर्तन बाप्पांची कृपा आहे. पूर्वी गणेशोत्सवात लोकसहभाग कमी प्रमाणात होता. आज प्रत्येक कुटुंबातला घटक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. हा गणेश मंडळांचा विजय आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. येथील निळूभाऊ फुले नाट्यगृहामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट बोलत होते.
पुढे पालकमंत्री बापट म्हणाले, पूर्वी गणेश मंडळांचे कार्यक्रम स्टेज ऐवजी स्टेजखाली चालायचे. आज परिस्थिती बदलली आहे. देवघरातला गणपती रस्त्यावर येत आहे. समाजाची जडण-घडण व तरुण वर्गामध्ये भक्ती वाढत आहे. हीच प्रेरणा दगडूशेठची आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक हर्षल ढोरे, महेश जगताप, नगरसेविका झामाबाई बारणे, वैशाली काळभोर, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, शारदा सोनवणे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, लांडगे आळी, भोसरी (श्रीकृष्ण जन्माची कथा), एसकेएफ गणेशोत्सव मंडळ, चिंचवड (स्रीशक्ती ही राष्ट्रशक्ती), जय बजरंग तरुण मंडळ निगडी गावठान (कालिकामातेची महिमा), खंडोबा मित्र मंडळ (कन्या अभिशाप अभिसाह्य) या मंडळांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळविला. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १२६ मंडळांपैकी ९६ मंडळे बक्षीसपात्र ठरली. बारा लाखांची रोख बक्षिसांचे वाटप करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या केरळच्या संकटासाठी या आवाहनाला एसकेएफ मित्र मंडळाने आकरा हजार रुपयांचा धनादेश लांडगे यांच्याकडे सुपूर्द केला. दत्तात्रय भोंडवे, दिलीप माळी, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, संभाजी सूर्यवंशी, संजय कुंभार, रामदास चिंचवडे, वैभव गोडसे, ललित म्हसेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बापूसाहेब ढमाले, विलास कामठे, राजाभाऊ गोलांडे अनिल वाघिरे यांनी संयोजन केले. हेमंत रासणे यांनी प्रास्ताविक केले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
आदेश : मद्यपान केल्यास दोन दांडकी मारा
माणूस बधिर झाला की अधिर होतो. गणेशोत्सव काळात तरुणांनी मद्यपान करू नये. स्वत: पिऊ नका, दुसऱ्याला पिऊ देऊ नका. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. डीजे लावू नये. मी पालकमंत्री म्हणून पोलीस प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. मला जर कोणत्या पोलिसांचा फोन आला तर एक दांडक्याऐवजी दोन दांडकी मारा म्हणून सांगून ठेवले आहे.