गिरीश बापट यांनी घेतली अधिका-यांची झाडाझडती, टॅब देण्याचा निर्णय; कामे का नाही केली ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:42 AM2017-09-22T05:42:47+5:302017-09-22T05:42:57+5:30
अन्न व औषध निरीक्षकांना टॅब देण्याच्या निर्णयाला वर्ष झाले. त्यासाठी निधी दिला, त्याची अंमलबजावणी तुमच्याकडून होत नसेल तर तीही आम्हीच करायची का? कामं होत नसतील तर सांगा, पर्यायी व्यवस्था करु, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अधिका-यांची झाडाझडती घेतली.
अतुल कुलकर्णी
मुंबई : अन्न व औषध निरीक्षकांना टॅब देण्याच्या निर्णयाला वर्ष झाले. त्यासाठी निधी दिला, त्याची अंमलबजावणी तुमच्याकडून होत नसेल तर तीही आम्हीच करायची का? कामं होत नसतील तर सांगा, पर्यायी व्यवस्था करु, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अधिका-यांची झाडाझडती घेतली.
एफडीएमध्ये अनेक निर्णय घेतले पण पुढे त्याचे काय झाले हे पहायचे कोणी? असे सवाल करत बापट यांनी मंत्रालयात विभागाचा आढावा घेताना तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्षानुवर्षे मुंबईत ठाण मांडून बसलेल्या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढूनही चार अधिका-यांना कार्यमुक्त केले नसल्याचे वृत्त लोकमतने २० सप्टेंबरला प्रकाशित केले होते. त्यावरुन बापट यांनी अधिका-यांना झापले. ही चूक कोणाही आहे असे विचारले असता, सगळे एकमेकांचे चेहरे पाहू लागले. डेस्क आॅफीसर वि.ग. शिंदे यांची चूक असल्याचे एका अधिका-याने सांगताच आदेश का पाळले नाहीत त्याची चौकशी करुन निलंबित करा, असे आदेश बापट यांनी दिले. मॅटच्या निर्णयाच्या विरोधात तातडीने उच्च न्यायालयात जाण्याची कारवाई पूर्ण करा असे आदेशही त्यांनी बैठकीत दिले.
सरकारने ५३१ टॅब खरेदी करण्यास मंजूरी दिली. हे टॅब अन्न व औषध निरीक्षकांना द्यायचे आहेत. टॅबसाठी निधी देऊन वर्ष झाले. यासाठीचे सॉफ्टवेअर कुठे आहे असे त्यांनी विचारले असता तयार आहे, दाखवतो अशी उत्तरे अधिकाºयांनी दिली. बैठकीस विभागाचे सचिव संजय देशमुख, आयुक्त पल्लवी दराडे तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.
>चांगले निर्णय जर अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे अंमलात येत नसतील तर त्या अधिकाºयांवर कारवाई केली जाईल. त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक जरुर करु पण कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही.
- गिरीश बापट, एफडीए मंत्री