गिरीश बापटांची जीभ पुन्हा घसरली! विद्यार्थिनींमध्ये कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:26 AM2018-01-13T02:26:24+5:302018-01-13T02:26:32+5:30
आठवी ते दहावीतील मुलींसमोर बोलताना ‘स्त्री-पुरूष संबंधाबाबत मी आत्ता काही बोलणार नाही. पण पूर्वीचा काळ आत्तासारखा नव्हता. चल, म्हटली की चालली!’ असे म्हणत ‘विद्यार्थिनींना कळले बघा’ अशी शेरेबाजी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
पुणे : आठवी ते दहावीतील मुलींसमोर बोलताना ‘स्त्री-पुरूष संबंधाबाबत मी आत्ता काही बोलणार नाही. पण पूर्वीचा काळ आत्तासारखा नव्हता. चल, म्हटली की चालली!’ असे म्हणत ‘विद्यार्थिनींना कळले बघा’ अशी शेरेबाजी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेच्या शताब्दीपूर्तीच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींसमोर बोलताना बापट म्हणाले, विवेकानंद परदेशात गेले होते, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे, भाषणामुळे एक परदेशी युवती आकर्षित झाली. ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर एकदा तिने विवेकानंदांना भेटून सांगितले की, मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. आपण लग्न केले, तर मला आणि तुम्हाला तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा होईल, अशी मागणी घातली. त्यावर विवेकानंद म्हणाले, लग्न करण्याची गरज नाही. मी तुम्हाला मातेसमान मानतो, तुम्ही मला मुलगा माना. तो काळच वेगळा होता. अन् आता ‘चल, म्हटली की चालली’!
बापट यांच्या तोंडून असे अपमानास्पद उद्गार निघाल्याने विद्यार्थिनींमध्ये कुजबुज सुरू झाली.