गिरीश बापट यांच्याच पावलावर पाऊल टाकणार; निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धंगेकर-रासने एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 06:16 PM2023-03-22T18:16:29+5:302023-03-22T18:19:47+5:30
निवडणूक ही स्पर्धा नसून लोकशाहीचा एक भाग
पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार लढत झाली. धंगेकरांनी कसब्यात विजय मिळवून इतिहास रचला. तब्बल ३० वर्षांनी भाजपने बालेकिल्ला गमावला. या निवडणुकीची देशभरात चर्चा झाली. निवडणुकीच्या काळात दोघांमध्ये टीका - टिपण्णी, आरोप - प्रत्यारोप सुरु होते. पण आता धंगेकर आमदार झाल्यावर दोघे पहिल्यांदा एकत्र आल्याचे दिसून आले आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या विकासनिधीतून पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपतीचे साकारलेल्या तैलचित्राचे गुढीपाडव्याच्या मुहर्तावर अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थित होते. दोघांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.
गिरीश बापटांचा मी आभारी आहे – रवींद्र धंगेकर
नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, मी दादापुढे (हेमंत रासने कडे हात करित म्हणाले) जास्त बोलत नाही. दादामुळे देशभरातील नागरिक मला ओळखायला लागले. मागील तीन दशकं गिरीश बापट यांनी पुण्याचा विकास केला. राजकीय स्तर कसा ठेवावा हे त्यांनी मला आणि हेमंत रासने यांना एकत्र आणून पुन्हा एकदा शिकवलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. गिरीश बापट यांनी काम करताना समाजाचा समतोल ठेऊन काम केलं आहे. त्यांच्या विरोधात मी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी मी बापटांचा अभ्यास केला आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. हेमंत रासने आणि मी मागील 15 वर्ष एकत्र काम करत आहोत, असंच काम करत राहू, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला.
आम्ही प्रतिस्पर्धी नसतो तर. – हेमंत रासने
निवडणुकीच्या वेळी आम्ही प्रतिस्पर्धी नसतो तर वेगवेगळ्या मतप्रवाहाचे उमेदवार असतो. केलेल्या कामासाठी आशीर्वाद मागत असतो. जनता दोघांनाही आशीर्वाद देते मात्र ज्याला जनता जास्त आशीर्वाद देते तो विजयी होतो आणि दुसरा उमेदवार त्याच्या पद्धतीने काम करत असतो, तसेच आम्ही दोघे यापुढील काळात देखील शहराच्या विकास कामांसाठी एकत्रित येऊ असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.