बालगृहातील मुलींच्या समस्या अखेर सुटणार
By admin | Published: October 27, 2016 05:03 AM2016-10-27T05:03:16+5:302016-10-27T05:03:16+5:30
शासकीय मुलींचे वरिष्ठ बालगृहातील समस्यांची महिला बालकल्याण विभागाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. येथील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
शिरूर : शासकीय मुलींचे वरिष्ठ बालगृहातील समस्यांची महिला बालकल्याण विभागाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. येथील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
या बालगृहाकडे जातीने लक्ष देणार असल्याचे विभागाचे विभागीय आयुक्त प्रशांत शिर्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निवासी अधीक्षिका नियुक्तीबाबत आयुक्तांनी शासनाकडे पाठपुरावा केला असून, दोन महिन्यांत हे पद नियुक्त केले जाईल. मुलींच्या आहार, साहित्य, वसतिगृहातील वीजसमस्या तातडीने सोडवण्याचे आदेश देण्यात आल्याचेही शिर्के यांनी सांगितले.
क्रांतिवीर प्रतिष्ठानने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन दोन दिवसांपूर्वी उपायुक्त शिर्के, प्रभारी अधीक्षिका (बालगृह) वर्षा पाटील आदींनी बालगृहाला भेट दिली. त्वरित विजेची समस्या सोडवण्याचे आदेश दिले व म्हणाले, की स्वयंपाकी महिला रजेवर असल्याने मुलींना दुपारचे जेवण मिळत नव्हते. स्वयंपाक स्वत: करावा लागत होता. मात्र, स्वयंपाकी महिला पुन्हा कामावर रुजू होत आहे. रोजंदारीवर एका स्वयंपाकी महिलेची नेमणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. निवासी अधीक्षिका नियुक्तीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला असून, दोन महिन्यांत अधीक्षिकेची
नियुक्ती होणार आहे. सध्या पाटील यांच्याकडे पदभार असून, दोन नोव्हेंबरपासून आर. एस. जावळे यांच्याकडे प्रभारी अधीक्षिकेचा पदभार देण्यात येणार आहे. (वार्ताहर)
बेमुदत उपोषण मागे...
कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून थकीत वेतनही त्यांना देण्यात आले असून, आजची परिस्थिती पाहता विजेची समस्या सोडवण्यात आली आहे. मुलींना कपडे, स्टेशनरी, तसेच इतर साहित्यही देण्यात आले. किराणा माल, भाजीपाला भरण्यात आला. रोजंदारीवर स्वयंपाकी नियुक्त करण्यात आली. दरम्यान, महिला बालविकास विभागाने तातडीने दखल घेतल्याने पाचंगे यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय मागे घेतला. शेळके व गवारी यांनीही समाधान व्यक्त केले.