गर्दीत तरुणीला भोवळ, खाकीच्या माणुसकीने ‘ती’ला जीवदान, गणपतीचे दर्शन घेतानाची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:57 AM2017-09-05T01:57:43+5:302017-09-05T01:58:02+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. बाप्पांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती...
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. बाप्पांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात अचानक एक युवती भोवळ येऊन पडली. मात्र एक खाकी वर्दीतील व्यक्तीने माणुसकीचे दर्शन घडवित रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी युवतीला नेऊन रुग्णालयात दाखल केले. काळे नुकतेच पुण्यात रुजू झाले असून ‘पोलीस शौर्य’ पुरस्कारविजेते आहेत.
डेक्कन परिसरात राहणारी मौसम जैन ही युवती बाप्पांच्या दर्शनासाठी रांगेत उभी होती. अचानक भोवळ येऊन ती पडली. काळे यांनी प्रसंगावधान दाखविल्याने त्या मुलीला वेळीच उपचार मिळू शकले. मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचले यावर मला विश्वासच बसत नसल्याचे मौसमने या वेळी सांगितले. या युवतीला आनंदाश्रू अनावर होत होते. विश्रामबाग फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात निरंजन सेवाभावी संस्थेने दरवर्षीप्रमाणे मिनी हॉस्पिटल उभारले आहे. यामध्ये ५ बेड, सर्व प्रकारची औषधे, लसी, सलाईन उपलब्ध केले आहे. महिलांसाठी २ बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीकरीता २० डॉक्टर्ससह सर्व यंत्रणा सज्ज आहे. तसेच सर्व प्रकारची मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी प्रचंड अशा गर्दीतून मौसम जैन या युवतीला हिला गर्दीतून वाट काढत हॉस्पिटलमध्ये आणले. खºया अर्थाने तिला दत्तात्रय काळे यांनी जीवदान दिले असून, तेच खरे हिरो असल्याचेही कासट यांनी सांगितले.