इंदापूरात विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू; ५ तास ठिय्या मांडल्यानंतर अधिका-यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:25 PM2023-07-07T14:25:28+5:302023-07-07T14:25:38+5:30
मुलीचे वडील हे भंगारचा दुकान चालवत असून तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
इंदापूर : इंदापूरच्या दर्गा मस्जिद चौकाजवळ ६ वर्षीय बालिकेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महावितरण विभाग व नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिका-यांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान घराशेजारी भावंडांबरोबर खेळत असणा-या कुलसुम हैदर मुशाहिदी (वय ६ वर्षे,रा.दर्गा मस्जिद चौक,माळीगल्ली, इंदापूर) या बालवाडीत शिकणा-या मुलीस महावितरण विभागाचा वीजेचा खांब व त्याच्या शेजारच्या भूमिगत वीजवाहिनीचा बॉक्स या दोन्हींचा विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. या संदर्भात तिचे वडील हैदर छोटन मुशाहिदी व शहरातील सुमारे तीनशेहून अधिक नागरिक महावितरण विभागाचे अधिकारी व नगरपरिषदेच्या अधिका-यांविरुध्द तक्रार देण्यासाठी इंदापूर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तो वीजेचा खांब नेमका कोणाच्या अखत्यारित येतो या वरुन पोलीस त्यांच्याशी वाद घालत बसले. त्यामुळे तक्रार दाखल होईना.
अखेर जोवर तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शिंदे, प्रा.कृष्णा ताटे, शकील सय्यद, ॲड. आशुतोष भोसले, अमजद बागवान, अस्लम बागवान, जकीर काजी, अश्फाक इनामदार, अक्रम शेख, ॲड इनायत काजी व इतरांनी घेतला. रात्री आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हे सर्वजण पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून बसले. नरमलेल्या पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. रात्री तीन वाजता त्या बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुलसूमचे वडील हे भंगारचा दुकान चालवतात. मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महावितरणच्या हलगर्जी व बेजबाबदारपणामुळे आमच्या चिमुकलीचा बळी गेल्याचा कुटुंबीयांनी व नागरिकांनी आरोप केला आहे. शहरात अनेक ठिकाणची विद्युत रोहित्रे उघड्यावर आहे. गंजलेले वाकलेले विद्युत खांब, दुरावस्थेत असणा-या विद्युत तारा अनेक ठिकाणी आढळतात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने तातडीने उपाययोजना करावी. आवश्यक त्या ठिकाणी खांबांना वीज प्रतिरोधक आवरण बसवावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.