त्या चिमुरडीने पाेटावर हात टाकला अन् मला मातृत्वाची जाणीव झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:00 PM2018-05-13T21:00:45+5:302018-05-13T21:00:45+5:30
जागतिक मातृदिनानिमित्त क्रिएटिंग पाॅसिबिलीटीज या संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी सामाजिक काम करणाऱ्या तसेच मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्या गाैरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. त्यावेळी गाैरी यांनी अापल्या अायुष्याचे अनेक पैलू उलगडले.
पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करत असताना एक देहविक्री करणारी महिला एके दिवशी अामच्या संस्थेत अाली. दुपारची जेवणाची वेळ हाेती. तिने जेवताना माझ्याकडे लाेणच्याची मागणी केली. तिच्या लाेणच्याच्या मागणी मागील कारण माझ्या लक्षात अाले हाेते. काही वर्षांनी त्या महिलेचे निधन झाल्याचे कळाले. तिच्या घराचा लिलाव करण्यात येत हाेता. त्यात तिच्या मुलीलाही विकण्यात येणार हाेते. तेव्हा मी त्या मुलीला घरी घेऊन अाले. रात्री झाेपल्यावर जेव्हा त्या पाच वर्षाच्या छाेट्या चिमुरडीने माझ्या पाेटावर अाई समजून हात टाकला तेव्हा खऱ्या अर्थाने मला माझ्या मातृत्वाची जाणीव झाली. ती माझी मुलगी अाज 14 वर्षांची अाहे. अशी सुन्न करणारी कहाणी तृतीयपंथी कार्यकर्त्या गाैरी सावंत सांगत हाेत्या.
जागतिक मातृदिनानिमित्त क्रिएटिंग पाॅसिबिलीटीज या संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी सामाजिक काम करणाऱ्या तसेच मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्या गाैरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. त्यावेळी गाैरी यांनी अापल्या अायुष्याचे अनेक पैलू उलगडले. संगीता शेटे यांनी गाैरी यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत गाैरी सावंत म्हणाल्या, माझा जन्म बायाेलाॅजिकली मुलगा म्हणून झाला हाेता. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मला मुलासारखंच वाढवण्यात अालं. नंतर माझ्यातील बदल घरच्यांना जाणवल्यानंतर त्यांनी मला वेगळी वागणूक देण्यास सुरुवात केली. माझ्यातील वेगळेपण सगळ्यांना कळाल्यानंतर काेणीच मला स्वीकारायला तयार नव्हतं, माझी अाई केवळ माझ्यामागे उभी राहिली. अाई व्यतिरिक्त कुणीही नातेवाईक माझ्याशी चांगले वागले नाहीत. जर लैंगिक शिक्षण पुस्तकात असतं तर कदाचित माझ्या घरचे माझ्याशी चांगले वागले असते. माझ्या वडीलांना माझा खूप राग हाेता. माझ्या बालपणी माझ्याकडे लक्ष देण्यात अालं नाही. माझ्या घरच्यांना मी नकाे हाेते. माझी अाई लवकर वारली. तिच्या जाण्यानंतरचं माझं अायुष्य अधिकच खडतर हाेतं. मी पळूण जात मुंबई गाठली अाणि तेथून माझा वेगळा प्रवास सुरु झाला.
सुरुवातीला घर साेडून चूक केली असं वाटलं, परंतु घरी माझी वाट पाहणारं काेणीच नव्हतं. मुंबईत माझ्या एका अाेळखीच्या तृतीयपंथीयाच्या घरी राहू लागले. तिने काही दिवस मला पाेसले नंतर तिने मला सिग्नलला भीक मागायला लावले. त्या दिवशी खरंतर मला भीक मागण्याची लाज वाटली नाही. त्यावेळी माझ्यात स्वतःला शाेधण्याचा मी प्रयत्न करत हाेते. माझ्या गुरुंनी मला शिक्षणासाठी प्राेत्साहन दिलं. खरंतर अापल्या देशाच्या राज्यघटनेत सर्वांना समान अधिकार अाहेत, स्वातंत्र्यानंतर अापण खूप पुढे जायला हवं हाेतं पण अापण अाता मागे चाललाे अाहाेत. अाम्हाला अामचा हक्क मिळावा यासाठी मी 2014 साली सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अाणि सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या हक्कामुळेच अाज मला माझी अाेळख मिळाली अाहे. अापल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 हून अधिक वर्ष झाली पण मला माझी अाेळख मिळून केवळ 4 वर्षे झाली अाहेत. त्यामुळे मी मला चार वर्षांची समजते.