अमेरिका रिटर्न गिफ्टच्या बहाण्याने तरूणीला ११ लाखांचा चूना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:04 PM2019-07-04T20:04:24+5:302019-07-04T20:17:39+5:30
फेसबुकवरच्या मैत्रीतून पाठवलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने तरुणीला तब्बल ११ लाख 59 हजार 500 रुपयांचा चूना लागल्याची घटना पुण्यात घडली आहे.
पुणे : फेसबुकवरच्या मैत्रीतून पाठवलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने तरुणीला तब्बल ११ लाख 59 हजार 500 रुपयांचा चूना लागल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी वानवडीपोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आणि खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात वानवडी भागात राहणाऱ्या 27 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. सदर प्रकार 11 ते 28 मार्च 2019 या काळात घडला आहे. या तरुणीची फिर्यादीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. तू सुंदर आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. लवकरच भारतात येऊन लग्न करणार असल्याची बतावणी तिला केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाइलवर एक फोन आला.
त्यात 'तुमचे गिफ्ट आले आहे. ते सोडविण्यासाठी 35 हजार रुपये कस्टम चार्जेस म्हणून भरावे लागतील', असे सांगितले. फिर्यादीने त्यानुसार पैसे ट्रान्सफर केले.त्यानंतर पुन्हा फोन आला. परदेशातून आलेल्या पाकिटामध्ये डॉलर आहेत. भारतीय चलनानुसार ती रक्कम अधिक आहे. त्यामुळे चलन बदलण्याचे आणि विमा क्लेमची किंमत म्हणून त्यांना वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले.त्यानंतरही फिर्यादीला कोणतेही गिफ्ट मिळाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे ध्यानात आले. त्यांनी पोलिसात धाव घेतली.