पुण्यातील ‘ती’ तरुणी पुन्हा दहशतवाद्यांच्या संपर्कात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:40 AM2017-08-02T03:40:51+5:302017-08-02T03:45:58+5:30

इसिसच्या संपर्कात आल्याने दोन वर्षांपूर्वी धर्मगुरुंकडून समुपदेशन करून सोडून देण्यात आलेली पुण्यातील ‘ती’ युवती सोशल मीडियामुळे पुन्हा दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

The girl in Pune again approached the terrorists? | पुण्यातील ‘ती’ तरुणी पुन्हा दहशतवाद्यांच्या संपर्कात?

पुण्यातील ‘ती’ तरुणी पुन्हा दहशतवाद्यांच्या संपर्कात?

Next

पुणे : इसिसच्या संपर्कात आल्याने दोन वर्षांपूर्वी धर्मगुरुंकडून समुपदेशन करून सोडून देण्यात आलेली पुण्यातील ‘ती’ युवती सोशल मीडियामुळे पुन्हा दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तपास यंत्रणांनी तिला काही दिवसांंपूर्वी दिल्लीमध्ये ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशी करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही मुलगी कट्टरपंथी विचारांनी मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली असून तिला योग्य समुपदेशन देण्याची आवश्यकता असल्याचेही अधिकाºयांनी पालकांना सांगितले आहे. या घटनेमुळे तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा संशयितांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही युवती दोन वर्षांपूर्वी आयएस (तत्कालीन इसिस - इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आली. तेव्हा या युवतीने आयएसमध्ये जाण्यासाठी सिरियाला जाण्याचे ठरविले होते. मात्र, त्या वेळी ती आयएसशी संबंधित असलेल्या काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसच्या तत्कालीन वरिष्ठ अधिका-यांना मिळाली होती. शहरातील मुस्लिम धर्मगुरू आणि अभ्यासकांची मदत घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले होते. दहशतवादाचा रस्ता योग्य नसल्याचे तिला पटवून देण्यात आले होते.
मात्र, तिला दिल्लीमध्ये तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्याने दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या समुपदेशनाचा परिणाम झाला होता का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पुण्यावरून ही युवती पालकांना कोणतीही कल्पना न देता दिल्लीला गेल्याचा संशय आहे. यासोबतच ती जम्मू आणि काश्मीरमध्ये काही जणांना भेटणार होती, असाही कयास तपास यंत्रणांकडून बांधण्यात आला आहे. सोशल मीडियावर तिच्याशी नेमके कोण संपर्कात
होते, याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा कोणता आॅनलाइन हॅन्डलर तिला देश सोडण्यासाठी आणि आयएसमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करीत होता, याचाही तपास सुरू आहे. तपास यंत्रणांनी आता तिच्या हालाचालींवरही बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर २०१५ मध्ये ही युवती फेसबुकद्वारे मोहम्मद सिराजुद्दीन याच्या संपर्कात आली होती. पुढे काही दिवसांनी त्याला जयपूरमधून अटकही करण्यात आली होती. इसिसच्या संपर्कात असल्याचा त्याच्यावर आरोप होता. मात्र, या युवतीने त्याच्याशी थेट संपर्क साधलेला नव्हता किंवा तसा प्रयत्नही त्या वेळी केलेला नव्हता.
अवघ्या चार महिन्यांच्या काळात या युवतीच्या वर्तनात कमालीचा बदल झाला होता. याबाबत पालकांना शंकाही येत होती. दरम्यान, एटीएसच्या वरिष्ठ अधिकाºयांना पुण्यातील एक युवती इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या युवतीचा शोध घेण्यात आला.
उच्चशिक्षित असलेल्या कुटुंबातील या युवतीचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यासाठी मुस्लिम धर्मगुरुंची मदतही घेण्यात आली होती. ही युवती कट्टरपंथी विचारांच्या प्रभावामधून बाहेर आल्याचे बोलले जात होते.
मात्र, दिल्लीमध्ये झालेल्या कारवाईमुळे तपास यंत्रणांना झटका बसला आहे. ‘डी रॅडिकलायझेशन’ केलेल्या तरुण-तरुणींच्या हालचालींवर यानिमित्त पुन्हा एकदा बारीक लक्ष ठेवायला सुरुवात करण्यात आली आहे.

Web Title: The girl in Pune again approached the terrorists?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.