मुलीने स्वतःचे अपहरण झाल्याचा मेसेज पाठवून कुटुंबियांना मागितले ५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 06:42 PM2021-11-11T18:42:21+5:302021-11-11T18:43:31+5:30
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता अचानकपणे गायब झाली होती
शिक्रापूर : मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीने स्वतःच्या मोबाईलवरून भावाच्या व्हाट्सअँपवर मेसेज करून ५ लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार शिक्रापूर तालुक्यात घडला आहे. पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता अचानकपणे गायब झाली होती. याबाबत शिक्रापूर पोलीस तपास करत होते. भावाच्या मोबाईलवर ''पाच लाख रुपये दया पैसे दिले नाहीतर तिचे जीवाचे काही खरे नाही'' असा मेसेज आल्यावर मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मुलीच्या अपहरणाची तक्रार दि .०४ नोव्हेंबरला नोंदविली होती.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली. मुलगी पुणे ते छापरा या रेल्वेने जात असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार बिहार राज्यातील छापरा रेल्वे पोलीस स्टेशनच्या स्थानिक पोलीसांची मदत घेऊन मुलीला ताब्यात घेण्यास कळविले. छापरा पोलिसांनी गुन्हयातील अल्पवयीन मुलीची ओळख पटवून तिला ताब्यात घेतले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. मुलीकडे अधिक चौकशी केल्यावर मोबाईल वरून पाठवलेला खंडणी मागणारा मेसेज हा मुलीने स्वतःच पाठवून पाच लाख रूपये खंडणी मागण्याचा बनाव केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीत, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे शिक्रापूर पोलीस स्टेशन यांचेसह पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर , पोलीस नाईक विकास पाटील , पो.ना. किरण निकम यांनी केली आहे.