पिंपळे सौदागर येथील तरुणाच्या हत्याप्रकरणात मुलीला सहआरोपी करावे : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 09:02 PM2020-06-13T21:02:14+5:302020-06-13T21:05:29+5:30
आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी
पिंपरी : प्रेमप्रकरणातून पिंपळे सौदागर येथील तरुणाची हत्या झाल्याची घटना निंदनीय आहे. संबंधित मुलीला देखील या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी सूचना आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सूचना केली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी या वेळी केली.
पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या तरुणावर रविवारी, दि. ७ जून रोजी हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान सोमवारी, दि. ८ जून रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. प्रेमप्रकरणातून हा खून करण्यात आल्याचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर पीडित जगताप कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अनेक जणांनी त्यांची भेट घेतली. रामदास आठवले यांनी देखील शनिवारी (दि. १३) सायंकाळी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पिंपरी येथे पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली.
आठवले म्हणाले, हत्याप्रकरणात पोलिसांनी चांगले काम केले. सहा आरोपींना त्यांनी पकडले आहे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मयत तरुणाची आई व आजीची मागणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने फोन केल्याने तरुण तेथे गेला. त्यावेळी त्याची क्रुरपणे हत्या झाली. मुलीने तिची भूमिका बदलली आहे. माझी आणि तरुणाची ओळख नव्हती, असे ती सांगत आहे. तसे होते तर मग फोन का केला, असा प्रश्न आहे. प्रेमप्रकरण होतं तर मुलीने मान्य करायला हवे होते. माज्यावर माज्या घरच्यांनी दबाव आणला आणि मला फोन करायला सांगून त्याला बोलावण्यास सांगितले, असे मुलीने सांगितले पाहिजे. कोणावरही अन्याय करण्याची आमची भूमिका नाही.ह्णह्ण