एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या; नराधमाला पोलिसांनी १२ तासात पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:00 PM2024-07-29T16:00:19+5:302024-07-29T16:00:44+5:30
लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून तरूणाने तरुणीचा जीव घेतला
चाकण : एकतर्फी प्रेम प्रकरणातून एकवीस वर्षीय युवतीचा चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.चाकण औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण (ता.खेड ) येथे (दि.२८ ) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली आहे.याप्रकरणी खून करून रातोरात फरार झालेल्या आरोपीला कराड (जि. सातारा ) येथून जेरबंद करण्यात आल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिली. प्राची विजय माने (वय.२१ वर्षे,सध्या रा.आंबेठाण,ता.खेड,जि. पुणे,मुळ रा.उरुण, इस्लामपुर,ता.वाळवा जि.सांगली )असे खून करण्यात आलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी अविराज रामचंद्र खरात (रा.बहे,ता. वाळवा,जि.सांगली) यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अविराज याने मैत्रीण प्राचीकडे लग्नाचा तगादा लावला होता. परंतु तिने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून अविराज हा (दि.२८ ) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्राची राहत असलेल्या आंबेठाण येथील रूमवर जाऊन तू माझ्याशी लग्न का करत नाही? असा प्रश्न विचारून,अविराज हा तिचा मोबाईल घेऊन चाकण-आंबेठाण रस्त्याजवळील मोकळ्या मैदानात आला. प्राची ही त्याच्याकडे मोबाईलची मागणी करत त्याच्या पाठोपाठ तिथे आली असता. अविराज याने अंधाराचा फायदा घेऊन अचानक प्राची हिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे ठार मारले आणि तो आपल्या दुचाकी वरून पळून गेला होता. यामुळे आरोपाला शोधणे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले होते.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा ( युनिट ३ ) च्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असताना आरोपी हा कराड,सातारा येथे दुचाकीवरून जात असल्याचे समोर आले.पोलिस पथकाने सातारा ते कराड महामार्ग एनएच ४ वर सापाळा रचुन १० ते १५ किलोमीटर आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेत असताना त्याने मोटर सायकल न थांबविता मोटर सायकलसह पुढे पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना पथकातील अंमलदारांनी जिवाची परवा न करता शिताफिने आरोपीस ताब्यात घेऊन म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड,यदुआढारी,सचिन मोरे,विठठल सानप,ऋषीकेश भोसुरे,सागर जैनक,राजकुमार हनमंते,रामदास मेरगळ,योगेश्वर कोळेकर,त्रिनयन बाळसराफ,सुधिर दांगट,समीर काळे,शशिकांत नांगरे,राहुल सुर्यवंशी,नागेश माळी यांनी केली आहे.