काठीने बेदम मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या ’मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:31 PM2018-08-22T16:31:11+5:302018-08-22T16:34:11+5:30
धनकवडीतील मोहननगर परिसरातील एका इमारतीमध्ये ‘अक्षरस्पर्श’ नावाची संस्था असून दिपाली संदीप निखळ या संचालिका आहेत.
पुणे : धनकवडी परिसरातील मतिमंद मुलांच्या संस्थेतील सोळा वर्षीय मुलीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २१ आॅगस्ट) मृत्यू झाला. एका सदनिकेत सुरू असलेल्या या संस्थेमध्ये मुलांना काठीने मारहाण करणे, अस्वच्छता, शिळे अन्न खायला दिले जात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सहकारनगरपोलिस ठाण्यात काही दिवसांपुर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी अनिल हातेकर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्त्या कांचन दोडे, किर्ती भंडगे आणि रजनी जोगदंड यांच्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.वैष्णवीची चुलत बहीण गायत्री सुनिल हातेकर (वय १८) हिने फिर्याद दिल्यानंतर संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनकवडीतील मोहननगर परिसरातील एका इमारतीमध्ये ‘अक्षरस्पर्श’ नावाची संस्था असून दिपाली संदीप निखळ या संचालिका आहेत. वैष्णवीला दि. २७ जुलै २०१७ रोजी आई-वडिलांनी संस्थेत दाखल केले होते. काही दिवसांपुर्वी तिची बहीण व आजी भेटण्यासाठी संस्थेत गेल्या होत्या. मात्र, तिची तब्येत ठिक नसल्याने त्यांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले असल्याची महिती त्यांना मिळाली.
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिच्या अंगावर मारहाणीचे जखमा आढळून आल्या. तसेच ती काही दिवसांपासून उपाशी असल्याचे निदर्शनास आले. तीन आठवड्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मंंगळवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
--------------