कुंडमळा बघायला गेलेली तरुणी इंद्रायणी नदीत बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:13 PM2018-07-09T14:13:18+5:302018-07-09T14:16:37+5:30
शालिनी तिचे भाऊ आणि बहिणीसोबत रविवारी इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला आली होती.
तळेगाव : इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला गेलेली तरुणी पाय घसरून नदी पात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहता न आल्याने तरुणी वाहून गेली. ही घटना रविवारी (दि. ८) दुपारी घडली. शालिनी चंद्राबालन (वय १७ , रा. आकुर्डी) असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने अद्यापपर्यंत शोधकार्य सुरू आहे.
तळेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शालिनी तिचे भाऊ आणि बहिणीसोबत रविवारी इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना शालिनीचा अचानक पाय घसरला आणि ती नदीपात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ती त्या प्रवाहात पोहू शकली नाही. तिला वाचविण्यासाठी तिचे भाऊ-बहीण देखील पाण्यात उतरले परंतु, पाण्याच्या प्रवाहात ते दोघेही वाहून जाऊ लागले. आसपास असलेल्या लोकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी भाऊ आणि बहिणीला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, शालिनी कुठेही आढळून आली नाही. तत्काळ एनडीआरएफच्या जवानांना बोलवण्यात आले. रविवारी दुपारपासून ते सोमवारी दुपारपर्यंत शोध कार्य सुरु होते. शालिनीचा शोध सुरू असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.