धक्कादायक! प्रेयसीकडून प्रियकराचा कोयत्याने गळा चिरुन खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 10:51 AM2020-03-03T10:51:27+5:302020-03-03T12:00:09+5:30
प्रियकराचे लग्न झाल्याचे समजल्याने झालेल्या वादातून प्रेयसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केला आहे.
पुणे / धायरी - प्रियकराचे लग्न झाल्याचे समजल्याने झालेल्या वादातून प्रेयसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना नर्हे येथील एस के नाईक कंपनीसमोर मंगळवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. प्रियकरांचा खून केल्यानंतर ही तरुणी स्वत: च पोलीस चौकीत हजर झाली. रक्ताने माखलेल्या हाताने तिने मी खून केला असे तेथील पोलिसांना सांगितल्यावर त्यांची एकच खळबळ उडाली.
अनुराधा करे ( वय २४, रा़ नारायण निवास, नर्हे - धायरी रोड, नर्हे, मूळ, करेवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली) असे आरोपीचे नाव असून महंतेश बिरादार ( वय २८, रा. संख किरंडी, तालुका जत, जिल्हा सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनुराधा व महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यातील होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाहही केला होता. परंतु त्यानंतर तो तिला भेटावयास टाळाटाळ करीत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला. रात्री त्याने माझे लग्न झाले असल्याचे तिला सांगितले. यावरून त्यांच्या दोघांत वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला.
महंतेश झोपलेला असताना पहाटे साडेचारच्या सुमारास तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून खून केला. खून झाल्यानंतर तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचे फोन करून कळविले. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्याने तिने स्वत: पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला अटक केली असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार
भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण
द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी