मैत्रिणीचे न्यूड फोटो व्हायरल; दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:55 PM2024-08-16T12:55:32+5:302024-08-16T12:56:01+5:30
मुलीच्या आईने तक्रार दाखल करताच दहावीत शिक्षण घेणाऱ्या ३ अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
किरण शिंदे
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनींचे फोटो मिळवले. आणि त्यानंतर मॉर्फ करत सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दहावीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, १६ जून ते ३० जून या कालावधीत हा प्रकार घडला. पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले २ विद्यार्थी हे दहावीच्या वर्गात आहेत. तर ताब्यात घेतलेला एक जण हा शाळा सोडून गेला असला तरी सुद्धा इतर मित्रांच्या संपर्कात होत असल्याची माहिती आहे. या अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन मैत्रिणींचे फोटो टेलिग्रामवरून अपलोड केले. हे फोटो मोर्फ करत न्यूड केले. आणि मॉर्फ केलेले हे फोटो शाळा सोडून गेलेल्या आपल्या तिसऱ्या मित्रांना पाठवले. हा संपूर्ण प्रकार जेव्हा शाळेतील शिक्षकांना कळला तेव्हा त्यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांना बोलावून याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली.
तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला. हे फोटो व्हायरल करणाऱ्या तीनही मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुद्धा करण्यात आले. त्यानंतर या सर्व मुलांना आज बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली.