प्रेयसीच्या आईचा कुत्र्याच्या पट्टयाने गळा आवळून खून; आरोपीचा जामीन फेटाळला
By नम्रता फडणीस | Published: April 11, 2024 05:41 PM2024-04-11T17:41:05+5:302024-04-11T17:41:35+5:30
महिलेने मुलीसोबतचे संबंध तोडण्यासह पुन्हा घरी न येण्याचे आरोपीला बजावले होते
पुणे : मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत् तसेच घरी येऊ नये असे ठणकावून सांगितल्याचा राग मनात धरुन प्रेयसीच्या आईचा कुत्र्याच्या पट्ट्याने गळा घोटणार्या तरूणाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांच्या न्यायालयाने फेटाळला. शिवांशू दयाराम गुप्ता (वय 23, रा. प्रतिकनगर, येरवडा) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. 18 जानेवारी 2024 रोजी पाषाण परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, 58 वर्षीय महिलेच्या मुलीने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेची 22 वर्षीय मुलगी व आरोपी यांचे प्रेमसंबंध होते.
गुप्ता हा खुनशी प्रवृत्तीचा असल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागले. यादरम्यान, त्याने प्रेयसी काम करत असलेल्या कंपनीमध्ये मेलद्वारे प्रेयसीची बदनामी केली. परिणामी, तिला कंपनीचा राजीनामा द्यावा लागला. त्या रागातून आरोपीने 58 वर्षीय महिलेला हाताने तसेच घरातील कुत्र्याला बांधण्याकरिता असलेल्या गळ्यातील पट्ट्याने गळा आवळून जीवे ठार मारले आणि मोबाईल घेऊन गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणात, बचावपक्षातर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. घटनेच्या दिवशी आरोपीच्या घरी येतानाचे व गुन्हा करून परत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. संपूर्ण कालावधी हा 30 मिनिटांचा असल्याने गुप्ता हा खूनाच्या उद्देशानेच आल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या दोर्याने आरोपीने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला तो दोरा आरोपीच्या घरात मिळून आल्याने
त्याचा गुन्ह्याशी संबंध असल्याचे दिसून येते. महिलेने गुप्ता याला मुलीसोबतचे संबंध तोडण्यासह पुन्हा घरी न येण्याचे बजावले होते. त्याचा राग आरोपीच्या मनात होता, असा युक्तिवाद अॅड. अगरवाल यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला.