विद्येच्या माहेरघरात मुलांपेक्षा मुलीच हुशार! दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी
By श्रीकिशन काळे | Published: May 25, 2023 12:27 PM2023-05-25T12:27:16+5:302023-05-25T12:27:34+5:30
पुणे विभागातून मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के तर मुलींचे ९५.६८ टक्के
पुणे : यंदाही बारावीच्या परीक्षेमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातच नव्हे तर पुणे विभागातही मुलींचीच संख्या उत्तीर्ण होण्यामध्ये अधिक आहे. मुलांपेक्षा मुलींनी चार टक्के अधिक मिळविल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुली मुलांपेक्षा अधिक अभ्यास करून परीक्षेत यश मिळवत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले.
बारावीच्या परीक्षेसाठी पुणे विभागातून १ लाख ३२ हजार ८०० विद्यार्थी, तर १ लाख ७ हजार ८९२ मुलींनी परीक्षा दिली. दोन्ही मिळून २ लाख ४० हजार ६९२ जण परीक्षेस बसले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार ४२७ मुले उत्तीर्ण झाली, तर १ लाख ३ हजार २३८ मुलींनी बाजी मारली. दोन्ही मिळून २ लाख २४ हजार ६६५ जण उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के तर मुलींचे ९५.६८ टक्के आहे. एकूण टक्केवारी ९३.३४ आहे.
राज्यात उत्तीर्णच्या प्रमाणात पुणे विभागाच्या मुली तिसऱ्या, कोकण पहिला, तर कोल्हापूर दुसरा...
राज्यातील नऊ विभागांमध्ये पुणे विभागातील मुलींच्या एकूण उत्तीर्णच्या टक्केवारीत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. पहिला क्रमांक कोकणच्या मुलींचा असून, त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४१ आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या मुली (९६.३५) आहेत. पुणे विभागाचा निकाल ९५.६८ टक्के लागला आहे. त्यामुळे राज्यात पुण्याच्या मुलींनी तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे.