शिक्षणासाठी येणाऱ्या मुली असुरक्षित
By admin | Published: July 27, 2016 04:31 AM2016-07-27T04:31:37+5:302016-07-27T04:31:37+5:30
कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या.
बारामती : कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकारानंतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्या. मुलींची छेड होतेच. त्रासदेखील होतो. त्याचबरोबर काही विद्यार्थिनी मित्रासमवेत शिक्षणाच्या नावाखाली निर्जन स्थळी महाविद्यालयीन वेळेत जातात. त्या गावगुंडांच्या सावज बनतात. त्यावर वेळीच प्रतिबंध घालण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या प्रामाणिक मुली रोडरोमिओंचा त्रास सहन करतात. छेड होत असल्याचे घरी सांगितल्यास शिक्षण बंद होईल, अशी भीतीदेखील त्यांना असते. त्यांना पालकांनी समजून घेतले पाहिजे. तरच मुली आई वडिलांपुढे ‘व्यक्त’ होतील.
‘लोकमत’च्या वार्ताहरांनी आज शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. शिक्षणासाठी बाहेरगावाहून बारामती शहरात विद्यार्थिनी येतात. शहरातील एसटी बसस्थानकातून पुन्हा महाविद्यालयापर्यंत ‘मिनी बस’ अथवा सहा सिटर रिक्षाने प्रवास करावा लागतो. एसटी बसस्थानकाच्या परिसरात मुलींचा घोळका ज्या बसमध्ये बसणार आहे, त्याच बसमध्ये बसण्याचा काही तरुणांचा अट्टहास असतो. गर्दीत मुलींशी लगट करण्याचा प्रकार होतो. गाडीत जागाच अपुरी असल्यामुळे मुलींना वेगळ्या प्रकारचा स्पर्श जाणवूनदेखील काही बोलता येत नाही, असे विद्यार्थिनींनी असह्यपणे सांगितले. मुलींसाठी स्वतंत्र बससेवा काही वर्षांपूर्वी बारामती एसटी आगाराने सुरू केली. स्वतंत्र बससेवेच्या काळात हा त्रास कमी झाला होता, असेदेखील त्यांनी सांगितले.
- बारामती शहरात ग्रामीण भागासह आसपासच्या तालुक्यातून येणाऱ्या मुलींना नेहमीचा त्रास सहन करावा लागतो, असे चित्र आढळून आले. बारामतीपाठोपाठ मोरगाव, माळेगाव, सोमेश्वरनगर, सुपे या मोठ्या गावांमध्ये पायी अथवा सायकलवर येणाऱ्या मुलींना संरक्षण देण्याची गरज आहे.
- माळेगावमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाण मोठे आहे. महाविद्यालयात नसणाऱ्या तरुणांकडून त्यांना त्रास होतो. बुलेट गाड्यांची क्रेझ आली आहे. त्या भरधाव मुलींच्या घोळक्यासमोरून पुढे नेणे, विचित्र हावभाव करणे, डायलॉगबाजी करून मुलींना छेडणे, असे प्रकार घडतात.
- खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी आलेल्या मुली हा त्रास निमूटपणे सहन करतात. हा प्रकार घरी पालकांना सांगितल्यास, शिक्षणच बंद होईल, अशी भीती मुलींना असते. त्यामुळे त्यांना समजून घेण्याची जबाबदारी पालकांची आहे. तरच त्या व्यक्त होतील. काही मुलींनी अशा भावना व्यक्त केल्या.