मुलींची जेवणासाठी ‘भागम भाग’, खानावळ केली बंद, ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:16 AM2017-10-18T03:16:10+5:302017-10-18T03:16:29+5:30
सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना मात्र मागील तीन दिवस जेवणासाठी ‘भागम भाग’ करावी लागल्याचे समोर आले आहे.
पुणे : सर्वत्र दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना मात्र मागील तीन दिवस जेवणासाठी ‘भागम भाग’ करावी लागल्याचे समोर आले आहे. दिवाळीसाठी वसतिगृहातील बहुतेक मुली गावी गेल्याने कंत्राटदाराने रविवारपासूनच खानावळ बंद केली. मात्र, वसतिगृहात राहिलेल्या मुलींच्या जेवणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दोन दिवस काही मुलींना नाष्टा तसेच रात्रीचे जेवणही मिळाले नाही.
विद्यापीठाला मंगळवारपासून दिवाळीची सुटी सुरू झाली आहे. मात्र, वसतिगृहात राहणाºया अनेक विद्यार्थी शनिवार व रविवारीच गावी गेले. मुलींच्या वसतिगृहात १३७० पैकी अनेक मुली शनिवारीच गावी गेल्या. प्रत्येक दिवाळीला हीच स्थिती असते. त्यामुळे खानावळीच्या कंत्राटदाराने मुलींची कमी संख्या असल्याचे कारण देत खानावळ दि. १५ ते २२ आॅक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रही विद्यापीठ प्रशासनाला दिले. तसेच वसतिगृहामध्येही तशी नोटीस लावण्यात आली. प्रशासनानेही काहीही माहिती न घेता संबंधित कंत्राटदाराला खानावळ बंद ठेवण्याची मुभा दिली. त्यानुसार रविवारपासूनच खानावळ बंद करण्यात आली.
दरम्यान, शनिवारपर्यंत वसतिगृहात सुमारे १२०० मुली गावी गेल्या. साधारणपणे १५० मुली वसतिगृहातच राहिल्या होत्या. या मुलींची नाष्टा व जेवणाची पर्यायी व्यवस्था मात्र विद्यापीठाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे बहुतेक मुलींना रविवारपासून स्वत:च जेवणाची व्यवस्था करावी लागली. विद्यापीठातील भोजनालय सुरू असल्याने काही मुलींना त्याचा आधार घ्यावा लागला. मात्र, सकाळचा नाष्ट्यासाठी वसतिगृहातून भोजनालयात जाणे अनेक मुलींनी टाळले, तर रात्रीच्या वेळी अंधारात जाणेही बहुतेक मुलींना शक्य झाले नाही. परिणामी बहुतेक मुलींनी दुपारीच रात्रीच्या जेवणाचे पार्सल नेले. त्यामुळे त्यांना रात्री थंड जेवणच घ्यावे लागले.
रविवारपासून सुरू असलेली मुलींची ही कसरत मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानुसार मग मंगळवारी रात्रीपासून संबंधित मुलींच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन पुढे सरसावले.
मुलींबाबत दुजाभाव का?
विद्यापीठात मुलींप्रमाणेच अनेक मुलेही दिवाळीनिमित्त गावी गेली आहेत. असे असताना केवळ मुलींचीच खानावळ बंद ठेवण्यात आली आहे. मुलांची खानावळ मात्र सुरूच आहे. तसेच मुलींची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. असा दुजाभाव केल्याबद्दल मुलींनी नाराजी व्यक्त केली.
वसतिगृहामध्ये रविवारपर्यंत सुमारे १५० मुली राहिल्या होत्या. मंगळवारपर्यंत ही संख्या ४० मुलींपर्यंत खाली आली. मुलींची संख्या कमी होत असल्याने कंत्राटदाराने खानावळ बंद ठेवली, पण हे चुकीचे होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याला मुलींच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले. पण कर्मचारी नसल्याने त्याने असमर्थता दर्शविली. त्यामुळे वसतिगृहापासून भोजनालयापर्यंत मुलींची ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळीच ही व्यवस्था करण्यात आली आहे. खानावळ शनिवारी सुरू होणार असल्याने मुलींसाठी तोपर्यंत ही व्यवस्था असेल. सध्या २५ ते ३० मुलींनी त्यासाठी मागणी केली आहे.
- टी. डी. निकम, मुख्य वसतिगृहप्रमुख