बारावीच्या फेरपरीक्षेतही मुलींचीच आघाडी, उत्तीर्णांची टक्केवारी घटली, राज्याचा निकाल २४.९६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 02:29 AM2017-08-22T02:29:10+5:302017-08-22T02:30:04+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालात मुलींनीच आघाडी घेतली असून, औरंगाबाद विभाग अव्वल ठरला आहे.
राज्य मंडळाकडून जुलैमध्ये घेतल्या जाणा-या फेरपरीक्षेचे यंदा दुसरे वर्ष होते. नऊ विभागीय मंडळांमधून नोंदणी केलेल्या एकूण ९४ हजार ३३६ विद्यार्थ्यांपैकी ९३ हजार २७१ जणांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी २३ हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २८.७२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची टक्केवारी २३.६१ एवढी आहे. एकूण ७ हजार ८४ मुली व १६ हजार १९९ मुले उत्तीर्ण झाली आहेत. विभागनिहाय निकालामध्ये औरंगाबाद विभाग अव्वल ठरला आहे. या विभागाचा निकाल सर्वाधिक ३७ टक्के लागला असून, त्याखालोखाल नागपूरचा निकाल ३४.१४ टक्के आहे. मुंबई विभागातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, हा विभाग १८.७४ टक्के निकालासह तळाला राहिला.
शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ३०.८० टक्के, कला शाखा २३.९८ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल २२.५४ टक्के आहे. व्यावसायिक शाखेचा निकाल २४.६२ टक्के लागला
आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५१ विद्यार्थ्यांना उच्च श्रेणी मिळाली असून, ५१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर १ हजार ९१ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी आणि २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.
मूळ गुणपत्रिका २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ नंतर महाविद्यालयात मिळणार.
२२ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत गुणपडताळणी करता येणार.
२२ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळतील.
सहा विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करता येणार.
उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळाल्यानंतर, पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल.
विभागनिहाय टक्केवारी
विभाग परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारी
पुणे १७२८४ ४४७४ २५.८९
नागपूर ९९५२ ३३९८ ३४.१४
औरंगाबाद ७१३८ २६४१ ३७.००
मुंबई २६७७१ ५०१६ १८.७४
कोल्हापूर ८०८३ २०३४ २५.१६
अमरावती ७२९८ १४१२ १९.३५
नाशिक १०८८५ २७६० २५.३६
लातूर ४९८१ १३६४ २७.९३
कोकण ८७९ १८४ २०.९३
एकूण ९३२७१ २३२८३ २४.९६