तरुणीचे फुप्फुस, हृदयदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:24 AM2017-08-18T01:24:43+5:302017-08-18T01:24:45+5:30

बावीस वर्षीय तरुणीचे फुप्फुस आणि हृदयदान करण्यात आल्याने दोन रुग्णांना संजीवनी मिळाली.

The girl's lungs, the heart | तरुणीचे फुप्फुस, हृदयदान

तरुणीचे फुप्फुस, हृदयदान

Next

पुणे : बावीस वर्षीय तरुणीचे फुप्फुस आणि हृदयदान करण्यात आल्याने दोन रुग्णांना संजीवनी मिळाली. ब्रेनडेड तरुणीचे फुप्फुस चेन्नईला ग्लोबल रुग्णालयात, तर हृदय मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले.
बावीस वर्षीय तरुणी उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारांसाठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती डॉक्टरांकडून या तरुणीस ब्रेनडेड घोषित करण्यात आले. नातेवाइकांचे समुपदेशन केल्यानंतर, अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला.
तरुणीचे हृदय मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. रात्री १ वाजून ४ मिनिटांनी रुग्णवाहिका रुबी हॉल रुग्णालयातून हृदय घेऊन निघाली. मध्यरात्री साडेतीन वाजता हृदय मुंबईला पोहोचले. त्यानंतर ते फोर्टिस रुग्णालयातील व्यक्तीमध्ये यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती झेडटीसीसीच्या पुणे विभागाच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
तरुणीचे फुप्फुस पुण्यातून प्रथमच ‘नॅशनल आॅर्गन अँड
टिश्यू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन’ (नोटो)तर्फे चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात प्रवासी विमानाने पाठवण्यात आले. रुग्णाचे फुप्फुस चांगल्या स्थितीत असल्याने ते चेन्नईला पाठवण्यात आले. चेन्नईतील टीम बुधवारी रात्री अकरा वाजता पुण्यात आली आणि फुप्फुस घेऊन मध्यरात्री ३ वाजता प्रवासी विमानाने चेन्नईला गेली.
‘ब्रेनडेड रुग्णाच्या शरीरातून फुप्फुस काढून घेण्याच्या शस्त्रक्रियेला दोन ते तीन तास लागतात. त्यानंतर ६ ते ९ तासांच्या आता प्रत्यारोपण करणे, क्रमप्राप्त ठरते.
प्रत्यारोपणापूर्वी संसर्ग टाळण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते’, अशी माहिती रुबी रुग्णालयातील अवयवदान समन्वयक सुरेखा जोशी यांनी दिली. फुप्फुसाला संसर्ग होऊ नये, यासाठी विशिष्ट प्रतिजैैविके आणि नेब्यलायझर वापरावी लागतात, असे रुबी हॉल रुग्णालयातील इन्सेन्सिव्हिस्ट डॉ. अभिजित देशमुख यांनी सांगितले.
>२९ वेळा ग्रीन कॉरिडॉर
पुणे पोलिसांनी आॅगस्ट २०१५ पासून
आतापर्यंत २९ वेळा अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉरसाठी साहाय्य केल्याचे गोखले यांनी सांगितले.
पुण्यातील रुग्णालयांमधून विमानतळापर्यंतचा प्रवास अल्पावधीत पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या ग्रीन कॉरिडॉरसह पुण्यातून तीन वेळा हृदय रुग्णवाहिकेतून मुंबईला पाठविताना; तसेच नाशिक, औैरंगाबाद आणि सोलापूरहून यकृत पुण्याला आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची मदत घेण्यात आली होती.

Web Title: The girl's lungs, the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.