मुलीच्या फोनने मदतीला धावला अन् टोळक्याने बेदम मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:16+5:302021-08-23T04:13:16+5:30
पुणे : वाटेत कोणाची गाडी बिघडली, तर ती घेऊन येण्यासाठी नेहमीच गॅरेजमधील कर्मचारी जात असतात. त्यात एखादी मुलगी अडचणीत ...
पुणे : वाटेत कोणाची गाडी बिघडली, तर ती घेऊन येण्यासाठी नेहमीच गॅरेजमधील कर्मचारी जात असतात. त्यात एखादी मुलगी अडचणीत असेल, तर तिच्या मदतीसाठी धावणाऱ्यांची संख्या कमी नसते. अशाच एका मुलीने गाडी बिघडल्याचे सांगितल्यावर मदतीला धावून गेलेल्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली. बोपदेव घाटात अर्ध्यावर एस वळणावर शुक्रवारी दुपारी २ वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी कासीम इस्माईल शेख (वय २३, रा. आश्रफनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मोहम्मद शेख, समीर शेख, फैज शेख, इम्रान शेख, इन्नू व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासीम शेख हे एका गॅरेजमध्ये काम करतात. मोहम्मद शेख व समीर शेख यांनी एका मुलीच्या मार्फत फोन केला व तिची अॅक्टिवा गाडी बंद पडली असून दुरुस्तीसाठी बोपदेव घाटात बोलावून घेतले. या फोनवरून दिलेल्या ठिकाणी मदतीसाठी शेख गेले. त्या वेळी तेथे हे टोळके त्याची वाटच पाहत होते. मोहम्मद शेख हा कासीमला म्हणाला की ‘‘उस दिन मेरे को सळी से मारता क्या कितने दिन भागेगा़ आया ना अभी, अब जाके बता’’ असे म्हणून त्याला बांबूने दोन्ही पायावर, उजवे हातावर, कमरेवर, डोक्यात मारुन जबर जखमी केले. या मारहाणीत त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. आरोपींनी जाताना त्याला ‘‘तू किधर कंप्लेट करेगा तो तेरे को गायब करेंगे’’ अशी धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.