Manoj Naravane: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये महिला छात्रांचे नि:पक्षपणे स्वागत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 01:19 PM2021-10-29T13:19:43+5:302021-10-29T17:58:01+5:30
पुण्यात एनडीएच्या १४१ तुकडीचा दिक्षांत संचलन सोहळा, मुलींना देणार समान प्रशिक्षण
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) आता मुलींना पण प्रवेश दिला जाणार आहे. त्यांचे नि:पक्षपणे स्वागत करा. मुलांप्रमाणेच मुलींनाही प्रबोधिनीत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सध्या मुलींना प्रवेश देण्यासाठी एनडीएत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे लवकरच त्यांच्या प्रशिक्षणालाही सुरवात होईल असे प्रतिपादन, लष्करप्रमुख मनोज नरवणे (Manoj Naravane) यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिच्या १४१ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी खेत्रपाल मैदानावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून लष्करप्रमुख उपस्थित होते. यावेळी छात्रांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या प्रसंगी एनडीएचे कमांडन्ट असित मिस्त्री, दक्षिण मुख्यलयाचे प्रमुख जे. एस. नैन, अभिनेते नाना पाटेकर यावेळी उपस्तित होते.
नरवणे म्हणाले, एनडीऐचे प्रवेशद्वार आज महिलांसाठी खुले झाले आहेत. ज्या पद्धतीने पुरुष छात्रांचे स्वागत प्रबोधिनित केले जाते त्याच पद्धतीने जल्लोषात आणि उत्साहात समान भावनेने महिला छात्रांचेही स्वागत करात अशी अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाला माहिती देत महिला उमेदवारांना एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देणारी अधिसूचना पुढील वर्षी मेपर्यंत निघेल असे सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षापर्यंत वाट न पाहता या वर्षीच नोव्हेंबर महिन्यात एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असे आदेश दिले होते. त्यानुसार आमची तयारी सुरु आहे.
भविष्यातील आव्हाहनांना सामोरे जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन लष्करप्रमुखांनी केले. यावेळी त्यांनी प्रबोधिनीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. नरवणे म्हणाले, संचलन सोहळ्याचा आढावा घेताला मला सन्मान आणि आनंद झाला. तुम्ही आज उभे आहात त्याच परेड मैदानावर मी ४२ वर्षांपूर्वी कॅडेट म्हणून उभा होतो. त्यावेळी या सोहळ्याचा आढावा मी घेईन याची कल्पनाही केली नव्हती. आज तुम्ही सशस्त्र दलांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश करणार आहात. विविध गणवेश तुम्ही परिधान करणार आहात. परंतु नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की सशस्त्र दलाची कोणतीही एक सेवा स्वतःहून आधुनिक युद्धे लढू शकत नाही आणि जिंकू शकत नाही. त्यामुळे एकत्रीतपणे लढण्याच्या दृष्टीने तयारी करा.
छात्रांचे होणार एकत्रित प्रशिक्षण
मुलींना एनडीएत प्रशिक्षण देण्यासाठी सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. चेन्नई येथील ऑफीसर ट्रेनिंग सेंटरमध्ये जा पद्धतीने महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांना एकत्रीत प्रशिक्षण दिले जाते त्याच पद्धतीने प्रबोधिनीतही प्रशिक्षण दिले जाईल. एनडीऐत मुलांप्रमाणेच मुलींनाही आता प्रवेश मिळणार आहे. मला खात्री आहे की पुरुष कॅडेट्सप्रमाणेच त्या चांगल्या कामगिरी करतील असे लष्कर प्रमुख म्हणाले.
स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल
भारतीय सैन्याला संपुर्ण जगात एक प्रतिष्ठा आहे. प्रबोधित महिलांना समान संधी मिळणार आहेत. ज्या दर्जाचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. त्याच दर्जाचे प्रशिक्षण मुलींनाही दिले जाणार आहे. यामुळे एनडीऐत स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने याद्वारे महत्वाचे पाऊल टाकले जाणार आहे. आज ४० वर्षांनी मी या जागेवर उभा आहे. येत्या ३० ते ४० वर्षात प्रबोधिती प्रशिक्षित झालेल्या महिला या जागेवर दिसतील अशा विश्वास लष्करप्रमुखांनी या वेळी व्यक्त केला.