महामार्गबाधितांना १० लाख रुपये गुंठा द्या - बाबाराजे जाधवराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:16 AM2018-07-13T01:16:12+5:302018-07-13T01:17:36+5:30
झेंडेवाडी ते नीरा राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. परंतु यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
गराडे - झेंडेवाडी ते नीरा राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. परंतु यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होणार आहे. शासनाकडून जमिनीस मिळणारा बाजारभाव कमी आहे. तरी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील शेतक-यांना १० लाख रुपये गुंठा बाजारभाव दिला जावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्याचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी केली.
काळेवाडी ( ता. पुरंदर ) येथील सरस्वती मंगल कार्यालयात बुधवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५मधील रस्त्याच्या विस्तारीकरण बाबत बाधीत शेतकरी व अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधवराव बोलत होते.
यावेळी शेतकरी बाळासाहेब काळे, गुलाब झेंडे , सागर काळे, अॅड. बबनराव लडकत, समीर झेंडे, गुलाब झेंडे, अविनाश झेंडे, अजित गोळे, बाळासाहेब झेंडे , संदिप जाधव, ऋषीकेश जाधव, रमेश भापकर, राजेंद्र काळे, रमेश विधाते, चिंतामणी काळे तसेच ढुमेवाडी, झेंडेवाडी , काळेवाडी, पवारवाडी, दिवे येथील शेतकरी उपस्थित होते.
शासनाच्या वतीने विषेष भूसंपादन अधिकारी समीक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे, कार्यकारी अभियंता राज्य मार्ग मिलिंद वाबळे, भूमिलेख उपअधिक्षक रविंद्र पिसे अधिकारी उपस्थित होते.
पवारवाडी येथील जवळपास २० घरे यांचा बहुचर्चित प्रश्न काही सुटण्यासारखा नाही. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावा, असे शेतकºयांनी म्हणणे मांडले.
साडेचार लाख रुपयांपर्यंत शासन गुंठ्याला बाजारभाव देण्यास तयार आहे. पण आपण केलेली १० लाख रुपयांची मागणी शासनाला कळविली जाईल. देण्यात येणारा मोबदला हा आर्थिक स्वरुपातच असेल, असे विशेष भूसंपादन अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी सांगितले.