फुरसुंगीला १०० पाण्याच्या टाक्या द्या
By admin | Published: March 24, 2017 04:21 AM2017-03-24T04:21:29+5:302017-03-24T04:21:29+5:30
फुरसुंगी गावाला २ हजार लिटरच्या १०० टाक्या महापालिका प्रशासनाकडून बांधून देण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी
पुणे : फुरसुंगी गावाला २ हजार लिटरच्या १०० टाक्या महापालिका प्रशासनाकडून बांधून देण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. त्याचबरोबर सध्या दिल्या जात असलेल्या टँकरच्या ४० फेऱ्यांमध्ये १०ने वाढ करून त्या ५० करण्याचाही निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.
महापालिकेचा कचरा डेपो असलेल्या फुरसुंगी येथील ग्रामस्थ व महापौर मुक्ता टिळक, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची बैठक गुरुवारी महापालिकेमध्ये झाली. या वेळी फुरसुंगी येथील कचरा डेपोचा प्रश्न, त्यांची पाणी समस्या, कचरा डेपोची दुर्गंधी व लिचेड आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
फुरसुंगी गावची लोकसंख्या १ लाख ६० हजार इतकी आहे. महापालिकेकडून या गावांना ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, ही संख्या अपुरी पडत असल्याने त्यामध्ये वाढ करून ती ५० करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी बैठकीमध्ये केली. फुरसुंगीसाठी १०० एमएलडीची मोठी टाकी बांधून देण्याचीही मागणी करण्यात आली, त्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करून पालिकेला जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना प्रशासनाने केली.