१५ लाख टन साखर इथेनॉलसाठी द्या, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाची केंद्र सरकारला विनंती

By नितीन चौधरी | Published: January 31, 2024 06:08 PM2024-01-31T18:08:02+5:302024-01-31T18:10:02+5:30

देशात यंदा ३१४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज...

Give 1.5 lakh tonnes of sugar for ethanol, requests the Central Government of the National Cooperative Sugar Federation | १५ लाख टन साखर इथेनॉलसाठी द्या, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाची केंद्र सरकारला विनंती

१५ लाख टन साखर इथेनॉलसाठी द्या, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाची केंद्र सरकारला विनंती

पुणे : देशात आजअखेर १८७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदाचे एकूण साखर उत्पादन ३१४ लाख टन होण्याचा अंदाज असून गेल्यावर्षी ३३१ लाख टन उत्पादन झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे १७ लाख टनांनी कमी असले तरी वर्षाअखेर ७५ ते ८० लाख टन साखर शिल्लक राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे आणखी किमान १५ लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीकडे वापर करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने केंद्र सरकारला केली आहे. यामुळे कारखान्यांत पडून असलेल्या बी हेवी मळीचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होऊन आसवनींसमोरील उभ्या ठाकलेल्या आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकेल, असे मत संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात ६५ लाख टन साखर उत्पादन

देशात जानेवारीअखेर देश पातळीवरील एकूण ५१७ कारखान्यांमधून १ हजार ९२८ लाख टन ऊसगाळप झाले असून त्यातून सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटकमधील ५ व गुजरातमधील १ अशा एकूण ६ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. देश पातळीवरील ऊसगाळपात अग्रक्रम राखलेल्या महाराष्ट्राने आतापर्यंत ६७६ लाख टन उसाचे गाळप केले असून त्यातून सरासरी ९.६० टक्के उताऱ्यासह ६५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. या गतीने महाराष्ट्रातील हंगाम एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे.

देशात यंदा ३१४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमधील ऊसगाळप ५७४ लाख टन झाले असून त्यातून सरासरी १०.५ टक्के उताऱ्यासह ५७.६५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम मेच्या मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकमध्ये ३७७ लाख टन ऊस गाळपातून सरासरी ९.७५ टक्के उताऱ्यासह जवळपास ३७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उर्वरित सर्व राज्यातील होणारे ऊसगाळप, सरासरी साखर उतारा आणि होणारे साखर उत्पादन लक्षात घेता यंदाच्या वर्षीच्या हंगाम अखेर देश पातळीवर साखर उत्पादन ३१४ लाख टनाचे होणे अपेक्षित आहे. परतीचा पाऊस तसेच इथेनॉल निर्मितीकडे वळणाऱ्या साखरेवरील आणलेले निर्बंध यामुळे नव्या साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ३३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

Web Title: Give 1.5 lakh tonnes of sugar for ethanol, requests the Central Government of the National Cooperative Sugar Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.