शेतीपंपांना २४ तास वीज द्या

By Admin | Published: May 6, 2017 01:40 AM2017-05-06T01:40:29+5:302017-05-06T01:40:29+5:30

नारायणगाव परिसरात अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या आठवड्यात

Give 24 hours of electricity to agricultural pumps | शेतीपंपांना २४ तास वीज द्या

शेतीपंपांना २४ तास वीज द्या

googlenewsNext

नारायणगाव परिसरात अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या आठवड्यात शेतीपंपांना वीजपुरवठा १२ तासांहून ६ तासांवर आणल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे़
शेतीपंपासाठी १२ तास वीजपुरवठा देण्यात येत होता़ परंतु काही दिवसांपासून ६ ते ७ तासच वीजपुरवठा होत आहे. शेतीपंपासाठी सलग वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नारायणगाव येथील शेतकरी शिवदास तांबे यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात वादळ झाल्याने अनेक भागांत विजेचे पोल पडलेत तर काही ठिकाणी वाकले आहेत. त्यामुळे येडगाव, धनगरवाडी, पिंपळगाव या तीन गावांमध्ये सलग तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्या गावांमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ वीजपुरवठा त्वरित सुरू होण्यासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरू केला़
वीजवितरण कंपनी वेळी-अवेळी पुरवठा खंडित करीत असल्याने नारायणगाव शहरातील अनेक व्यवसाय ठप्प होत असल्याने व्यापारी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे़
याबाबत नारायणगाव वीजवितरण कंपनीचे नारायणगाव शहराचे सहायक अभियंता शेंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की पावसाची परिस्थिती दिसल्यास भारनियमन करण्यात येते किंवा वरिष्ठ कार्यालयातून इमर्जन्सी आल्यास भारनियमन करावे लागते़ पुढील ४८ तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल़

आंबेगाव तालुक्यात विजेचे अघोषित भारनियमन सुरू आहे. कडक उन्हामुळे विजेची मागणी जास्त; मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, भारनियमनामुळे सर्वच जण त्रस्त झाले आहेत.
उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते; मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नाही. यामुळे वारंवार भारनियमन करावे लागते. वीज वितरण कंपनीला अचानक २ तासांचे भारनियमन करा, अशी सूचना येते व लगेच भारनियमन सुरू होते.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात भारनियमन होत आहे. त्याचा फटका सर्वच वर्गांना बसत आहे. तीव्र उन्हामुळे शेतीपिकांना वारंवार पाणी द्यावे लागते. अनेक सार्वजनिक विहिरींमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचे दिवस ठरवून घेतले आहेत. मात्र, अचानक होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, पाणी असूनही पिके जळू लागली आहेत.

Web Title: Give 24 hours of electricity to agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.