मुलांचे लसीकरण करतेवेळी ‘पॅरासिटामॉल सिरप’चा डोस द्या; आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 1, 2024 05:26 PM2024-06-01T17:26:37+5:302024-06-01T17:27:08+5:30
सर्वाेत्तम प्रयत्नांनंतरही बालकांना आराेग्य यंत्रणेकडून अर्धवट लसीकरण केले जाते किंवा लसीकरणापासून दूर ठेवले जाते. अपूर्ण लसीकरण झाल्यास बालकांना लसीकरणानंतर ताप, जेथे डाेस दिला आहे, तेथे वेदना, सूज यांसारख्या किरकाेळ प्रतिकूल घटनाही घडतात...
पुणे : आराेग्य यंत्रणेकडून लहान मुलांचे लसीकरण केल्यावर काहींना ताप येताे. त्यावेळी त्यांना तापेच्या पॅरासिटामाॅल गाेळ्या बालकांना देण्यात येतात; परंतु या गाेळ्यांचे तुकडे करून द्यावे लागत असल्याने काहींना ओव्हर डाेस, तर काहींना अंडर डाेस दिला जाऊ शकताे. म्हणून, इथून पुढे मुलांना लसीकरण केल्यावर त्यांना गोळ्यांऐवजी वयानुसार पॅरासिटामॉलचा डोस सिरपच्या स्वरूपात द्यावा, अशा सूचना केंद्रीय आराेग्य विभागाने देशातील सर्वच राज्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्रालाही या सूचना प्राप्त झाल्या असून, त्यावरून पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सर्व रुग्णालयांना याबाबत सूचना जारी केल्या आहेत.
सर्वाेत्तम प्रयत्नांनंतरही बालकांना आराेग्य यंत्रणेकडून अर्धवट लसीकरण केले जाते किंवा लसीकरणापासून दूर ठेवले जाते. अपूर्ण लसीकरण झाल्यास बालकांना लसीकरणानंतर ताप, जेथे डाेस दिला आहे, तेथे वेदना, सूज यांसारख्या किरकाेळ प्रतिकूल घटनाही घडतात. त्यावेळी आराेग्य कर्मचारी हे या बालकांना ५०० मिलीग्रॅम पॅरासिटामाॅल गाेळीचे चार किंवा आठ तुकडे करतात. ते वयानुसार बालकांना देतात; परंतु यावेळी गाेळया अचूकप्रमाणे माेडणे कठीण असते. त्यामुळे, डाेस कमी जास्त प्रमाणात हाेऊ शकताे.
म्हणून, पॅरासिटामॉलचा डोस वयानुसार आणि गरजेनुसार दिल्यास तापाचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल आणि लसीकरणाचे प्रमाण वाढू शकेल, यासाठी पॅरासिटामाॅल गाेळीच्या स्वरूपाऐवजी द्रव म्हणजेच सिरप स्वरूपात द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत केंद्र शासनाने सूचना पाठवल्या असून, वैद्यकीय अधिकारी आणि लसीकरण कर्मचाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात पॅरासिटामॉलचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठीही तयारी करण्यात आली आहे.
वयोगट - डोस
६ आठवडे ते ६ महिने - २.५ एमएल
६ ते २५ महिने - ५ एमएल
२ ते ४ वर्षे - ७.५ एमएल
४ ते ६ वर्षे - १० एमएल
काय काळजी घ्यावी?
- लसीकरणानंतर ताप आल्यास आणि ४ ते ६ तासांपर्यंत कायम राहिल्यासच डोस द्यावा.
- २ किलोग्रॅमहून कमी वजन असणाऱ्या बाळांना डोस देऊ नये.
- ताप खूप कालावधीपर्यंत कायम राहिल्यास २४ तासांमध्ये जास्तीत जास्त ४ वेळा डोस देता येईल. दोन डोसमध्ये चार तासांचे अंतर असावे.