अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:15 AM2017-08-01T04:15:36+5:302017-08-01T04:15:36+5:30
अण्णा भाऊंच्या शाहिरी आणि साहित्यनिर्मितीने मराठी साहित्य आणि संस्कृती विश्व कायमच प्रभावित केले असून, त्यांच्या लेखणीतून जागतिक कर्तृत्व लक्षात घेऊन निदान मृत्यूनंतर तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न
पुणे : अण्णा भाऊंच्या शाहिरी आणि साहित्यनिर्मितीने मराठी साहित्य आणि संस्कृती विश्व कायमच प्रभावित केले असून, त्यांच्या लेखणीतून जागतिक कर्तृत्व लक्षात घेऊन निदान मृत्यूनंतर तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवांकित करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षडॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.
अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे या प्रमुख मागणीकडे राज्य आणि
केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष
भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित साहित्यिक क्रांतिज्योत दिंडीचा समारोप सोमवारी झाला,
त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते
बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावातून
२६ जुलै रोजी निघालेल्या या साहित्यिक क्रांतिज्योत आणण्यात आली. सारसबागेसमोरील अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमाला साहित्यिक रतनलाल सोनग्रा, उपमाहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, रूपाली चाकणकर, अशोक राठी, महंमद शेख, दत्ता सायकर, वामन कदम, सुनीता अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
भगवान वैराट म्हणाले, ‘‘वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावातून निघालेल्या साहित्यिक क्रांतिज्योत माजी खासदार
जयवंतराव आवळे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. या दिंडीत सुमारे ५०० कार्यकर्त्यांचा समावेश होता. ज्योत घेऊन दिंडीच्या अग्रभागी असलेल्या कार्यकर्यांनी संपूर्ण दिंडी मार्गावर अण्णा भाऊ साठे यांचा जयघोष केला. वाटेगाव येथून निघालेल्या या दिंडीचे कराड-सातारा-कवठे-खंडाळा-शिरवळ-राजगड साखर कारखाना-निघडे-खेड शिवापूर आणि कात्रज मार्गे पुणे येथे
आगमन झाले.
संपूर्ण दिंडीदरम्यान त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक राजकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी दिंडीचे स्वागत करून अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले. तसेच, अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, ही मागणी असून तिला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. काशिनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.