हक्काचे पाणी प्रकल्पग्रस्तांना द्या
By admin | Published: April 11, 2016 12:37 AM2016-04-11T00:37:10+5:302016-04-11T00:37:10+5:30
उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन
इंदापूर : उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन तासांवर आणलेला वीजपुरवठा आठ तास करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटी व उजनी धरणग्रस्त संवर्धन समितीच्या वतीने रविवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगराई येथील बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उजनी पाणलोट क्षेत्रातील सुमारे शंभर गावांमधील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अचानक वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या गावातील नळ पाणीपुरवठा योजना, पिठाच्या गिरण्या, मिरची कांडप यंत्रे यांच्यासह शेतकऱ्यांचे लघुउद्योग अडचणीत आले आहेत. या संदर्भात ७ एप्रिल रोजी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा.
पुरेशा दाबाने आठ तास वीज मिळावी अशी मागणी करून दखल घेतली गेली नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
उजनी धरणग्रस्त संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष अंकुश पाडुळे यांचे भाषण झाले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंता सज्जाद शेख, रघुनाथ गोफणे यांच्या उपस्थितीत तहसीलदार वर्षा लांडगे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, मयूरसिंह पाटील, मंगेश पाटील, मुकुंद शहा, नगराध्यक्ष अशोक इजगुडे, भरत शहा,
विलास वाघमोडे, दीपक जाधव, प्रमोद राऊत, उजेर शेख, ऋतुजा पाटील, माया विंचू, अलका ताटे आदींसह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
उजनी प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली जाईल. वीजकपात व इतर प्रश्न त्यांच्यासमोर मांडले जातील, असे हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी सांगितले.