पूर्वीप्रमाणेच कमिशन द्या; विविध मागण्यांसाठी पोस्टल एजंट रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 04:34 PM2017-10-12T16:34:58+5:302017-10-12T16:42:47+5:30
विविध कारणावरुन द आॅल इंडिया महिला प्रधान आणि स्मॉल सेव्हींग्ज फेडरेशनच्या वतीने गुरुवारी शाहू उद्यान ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढण्यात आला.
पुणे : पोस्टल एजंटांच्या (मध्यस्थ) कमिशनमध्ये केलेली कपात, कामाच्या पद्धतीत केलेला बदल अशा विविध कारणावरुन द आॅल इंडिया महिला प्रधान आणि स्मॉल सेव्हींग्ज फेडरेशनच्या वतीने गुरुवारी शाहू उद्यान ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढण्यात आला.
पोस्टल एजंटांचे कमिशन १ वरुन अर्धा टक्के करण्यात आले असून, त्यांचा प्रोत्साहन भत्ता (इन्सेन्टीव्ह) देखील बंद करण्यात आला आहे. पीपीएफ आणि ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक एजंटांकडून काढण्यात आली आहे. पोस्टल एजंट हे पूर्वी सर्व पोस्टात काम करीत असत. या कामाच्या पद्धतीत बदल करीत, त्यांना दोन पोस्टाचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे एजंटांच्या कामावर मर्यादा आल्या आहेत. पोस्टाच्या नवीन योजना या थेट सुरु करण्यात येत आहेत. एजंटांना त्यात स्थान नाही.
एकीकडे महागाई वाढत असताना कमिशनमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी नोकरांना पाचवा अणि सहावा आयोग लागू करण्यात आला आहे. एजंटांना मात्र डावलण्यात येत आहे. एजंटांना पूर्वी प्रमाणेच कमिशन देण्यात यावे. एजंटांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी शामला गोपीनाथ आयोगाऐवजी दुसरा आयोग नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
शहरात एक हजार एजंट असून, त्यात महिलांचे लक्षणीय प्रमाण आहे. आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेचे कोषाध्यक्ष कौस्तुभ ठकार यांनी सांगितले. या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष राजश्री भगत आणि शहरातील सुमारे दोनशे एजंट सहभागी झाले होते.