Exclusive: पुणेकरांना सर्वात आधी द्या कोरोना लस; मोदी सरकार घेणार का 'त्या' पत्राची दखल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:23 AM2021-02-16T10:23:00+5:302021-02-16T11:58:46+5:30
पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोव्हिड रिस्पाॅन्सची मागणी; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना लिहिलं पत्र
पुणे: पुण्यातल्या कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता पुणेकरांचे सर्वात आधी लसीकरण (Corona Vaccine to Pune Residents) करण्यात यावे अशी मागणी पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोव्हिड रिस्पाॅन्सच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांना त्यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे. कोरोना पुण्यामध्ये सर्वाधिक पसरला असताना सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने पुढाकार घेऊन शासकीय अधिकारी, शहरातील सर्व प्रमुख रुग्णालयांचे पदाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी आणि पुण्यातल्या एमसीसीआयएचे मेंबर्स यांनी समन्वयासाठी या गटाची स्थापना केली होती.
कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा
गेल्या काही दिवसांमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आता या गटाच्या वतीने आता ही मागणी करण्यात आली आहे. पुण्यात पाॅझिटिव्हिटी रेट १०% वर गेला आहे. रुग्णांच्या संख्येत देखील गेल्या काही दिवसांपासून वाढ होते आहे. हे लक्षात घेता ही मागणी करण्यात आली असून यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची वेळही मागण्यात आल्याचे पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोव्हिड रिस्पाॅन्सचे प्रमुख सुधीर मेहता यांनी सांगितले.
सीरम इन्स्टिट्यूट (serum institute) या पुण्यातल्या कंपनी कडून कोव्हिडची लस तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडे याचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे या लशींचा वापर करुन लसीकरण करण्यात यावे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
चिंताजनक! भारतात कोरोनाची लस दिल्यानंतर २७ लोकांचा मृत्यू; आरोग्यमंत्रालयानं सांगितले की...
लोकमतशी बोलताना मेहता म्हणाले “ पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच सरकारने ठरवलेल्या क्रमानेच मात्र वेगाने पुणेकरांचे लसीकरण करण्यात यावे अशी आमची भूमिका आहे. पुढील तीन महिन्यात जर हे लसीकरण पूर्ण झाले, तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळू शकतो. सीरमकडे लस शिल्लक आहे आणि ती पुण्यातच आहे. त्यामुळे पुणेकरांचे लसीकरण पूर्ण करावे असे आमचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले असून चर्चा करणासाठी त्यांची वेळही मागितली आहे.”