"गरजू नागरिकांना रेमडेसिवीरचा एक डोस मोफत द्या", आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 12:37 PM2021-04-09T12:37:27+5:302021-04-09T12:41:52+5:30
चंद्रकांत पाटील यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धतेचा आढावा
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने ना नफा ना तोटा तत्वावर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहे. ही अतिशय समाधानाची बाब आहे. मात्र अशा परिस्थितीत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या नागरिकांना रेमडेसिवीरचा एक डोस मोफत द्या अशी घोषणा आमदारचंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना दिवसभर फिरावं लागत आहे. त्यामुळे असोसिएशनने शक्य तितक्या रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सध्या पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती पाटील यांच्यासमोर मांडली. तसेच, असोसिएशनकडून रुग्णांच्या नातेवाइकांचा त्रास कमी करण्यासाठी उपलब्ध साठ्यापैकी ना नफा ना तोटा तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी काही रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनचे वाटप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अनिल बेलकर, रोहित कर्पे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे, त्यांचे अनुभव पाटील यांनी ऐकून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना किमान एक डोस मोफत देण्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली.