कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांत द्या
By admin | Published: September 2, 2016 05:48 AM2016-09-02T05:48:44+5:302016-09-02T05:48:44+5:30
तब्बल दोन वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन दोन महिन्यांत देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या
पुणे : तब्बल दोन वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन दोन महिन्यांत देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असला तरी बालचित्रवाणीला सक्षम करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे या संस्थेचे पुढे काय होणार, हा प्रश्न कायम आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संस्थेला सक्षम करून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, १ एप्रिल २0१४ पासून बालचित्रवाणीचे कर्मचारी विनावेतन काम करत आहेत. वेतनच मिळत नसल्याने शेवटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. गेल्या वर्षी औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. परंतु, राज्य शासनाने त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तसेच येत्या दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांचे सर्व वेतन देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले.