गंभीर झालेल्या रुग्णाला तातडीने उपचार देणार; ससूनमध्येही आता Code Blue टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:27 PM2023-02-13T14:27:05+5:302023-02-13T14:27:16+5:30
ससूनमध्ये ६० टक्के रुग्ण गंभीर स्वरूपाचे असतात
पुणे : खासगी रुग्णालयांमध्ये विविध वाॅर्डात (उपचार कक्षात) बाह्यरुग्ण विभागात एखादा रुग्ण अचानक गंभीर झाल्यास अशा रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक असते. ऑक्सिजन कमी हाेणे, हृदयविकाराचा धक्का, चक्कर येणे अशा विविध कारणांमुळे रुग्ण जागेवरच काेसळताे. अशा वेळी त्याच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये ‘काेड ब्ल्यू’ ही स्पेशल टीम असते. खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर आता ससूनमध्येही अशी ‘काेड ब्ल्यू’ टीम तयार करण्यात येत आहे.
ससून रुग्णालयात बहुतांश रुग्ण हे मुळातच उच्च दर्जाच्या उपचारांची आवश्यकता असलेले भरती होतात. जवळपास एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण गंभीर स्वरूपाचे असतात. त्यापैकी बहुतेक वेळा काही रुग्णांना कक्षात उपचार सुरू असताना किंवा बाह्यरुग्ण विभागात, रुग्णालयाच्या आवारात, तातडीच्या कक्षात गंभीर हाेतात. अशावेळी त्या रुग्णांना ही ‘काेड ब्ल्यू’ची टीम तातडीने असेल त्या ठिकाणी रुग्णांना तातडीचे उपचार देईल, अशी माहीती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांनी दिली.
‘काेड ब्ल्यू’ टीम ही एखादा रुग्ण रुग्णालयाच्या आवारात काेठेही गंभीर झाला तर तेथे जाईल. त्या रुग्णाची नाडी व ठाेके तपासून हृदयाचे कार्य, श्वास चालू आहे का? याची तपासणी करेल व त्यानुसार तातडीने उपचार सुरू केले जातील. रुग्णांचे हृदयाचे ठाेके बंद पडत असेल तर त्याला पंपिंग करेल. तसेच, श्वास घेण्यास अडचण येत असेल तर त्याला ‘सीपीआर’ (ताेंडातून श्वास देणे) देईल. तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे याेग्य ते उपचार देऊन त्याचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करेल.
काय आहे ‘काेड ब्ल्यू’ टीम?
‘काेड ब्ल्यू’ टीममध्ये तातडीच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे प्रशिक्षण घेतलेले डाॅक्टर, परिचारिका असतात व ते २४ तास सज्ज असतात. ते नेहमीच स्टॅण्डबाय असतात व जेथे गरज पडेल तेथे तातडीने जातात. त्यांच्याकडे रुग्णाला तपासणी करण्यासाठी आवश्यक ती साधने, ऑक्सिजन देण्यासाठी अॅम्ब्यू बॅगही असते.
‘काेड ब्लू’ टीमचे कार्य कसे चालते?
- हाॅस्पिटलमध्ये रुग्ण गंभीर झाल्यास तेथील डाॅक्टर, परिचारिका ‘काेड ब्लू’ टीमला फाेन किंवा अलार्मच्या मदतीने पाचारण करतील.
- रुग्ण जेथे आहे तो वाॅर्ड, ठिकाण किंवा ओपीडीचा उल्लेख करतील
- ही टीम जेथे आहे तेथे तात्काळ पाेहचून रुग्णावर उपचार सुरू करतील
- त्वरित जीवरक्षक उपचार मिळाल्याने रुग्णाचा जीव वाचण्यास मदत हाेईल.
- पुढील उपचारासाठी त्याला आयसीयूमध्ये भरती केले जाईल.
''ससून रुग्णालयात गंभीर रुग्णांची संख्या माेठी असते. अशा वेळी अनेक रुग्ण गंभीर हाेतात. या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी ‘काेड ब्लू’ टीमची स्थापना करण्यात येत आहे. या डाॅक्टरांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे, तातडीच्या रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत हाेईल. - डाॅ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय''