पीएमपीला कुणी जागा देता का जागा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 07:00 AM2019-11-09T07:00:00+5:302019-11-09T07:00:02+5:30
‘पीएमपी’ची मागणी : नवीन बसही उभ्या राहतात रस्त्यावर..
पुणे : नवीन बसमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) चा ताफा वाढत असला तरी या बस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, पीएमपीच्या शेकडो बस आगारांच्या बाहेर उभ्या कराव्या लागत आहेत. प्रशासनाकडून मागील अनेक वर्षांपासून दोन्ही महापालिकांकडे जागेची मागणी केली जात आहे. पण या आवाहनाला पालिकांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने ‘कुणी जागा देता का जागा’ असे म्हणण्याची वेळ ‘पीएमपी’वर आली आहे.
‘पीएमपी’च्या मालकीच्या सध्या सुमारे १६२५ बस आहेत. या सर्व बस १३ आगारांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १९७ बस न.ता.वाडी आगारामध्ये तर सर्वात कमी ७१ बस भोसरी आगारामध्ये आहेत. याच भोसरी आगारामध्ये जागा नसल्याने २४ मिडी बस शेवाळवाडी आगारामध्ये लावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. या घटनेच्या निमित्ताने सर्वच आगारांमधील सद्याची स्थिती ‘भोसरी’ प्रमाणेच असल्याचे चित्र आहे. न.ता.वाडी व भोसरीसह स्वारगेट, कात्रज, कोथरुड, पुणे स्टेशन, मार्केटयार्ड, निगडी, बालेवाडी, पिंपरी या आगारांमधील बसच्या तुलनेत जागा अपुरी आहे. रात्री बस संचलन थांबल्यानंतर पहाटेपर्यंत या सर्व बस आगारांमध्ये पार्किंगसाठी जातात. पण सर्वच बस आगारात उभ्या केल्या जात नाही. अनेक बस रस्त्यांवरच थांबवाव्या लागत आहेत.
मागील काही वर्षांपासून ‘पीएमपी’ची ही अवस्था असली तरी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही, असे दिसते. नवीन तीन आगार सुरू करण्यात आले मात्र, दोन वर्षांपासून ताफ्यात ६०० हून अधिक नवीन बस दाखल झाल्या. पुढील काही दिवसांत त्यात आणखी बसची भर पडणार आहे. बस वाढल्या तरी त्या उभ्या करण्यासाठी आवश्यक जागा मात्र वाढली नाही. यावर मात करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे जागा देण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. पण शहरांमध्ये जागा उपलब्ध नसून शहराबाहेरील जागांशिवाय पीएमपीला पर्याय नाही. त्यामुळे याच जागांवर चर्चा केली जात आहे. प्रत्यक्षात शहरी भागातील आगारांमधील बहुतेक आगारांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बस असल्याने मनपा भवन, स्वारगेट, मार्केटयार्ड, कात्रज, पुणे स्टेशन या भागात रस्त्यावरच बस उभ्या केलेल्या दिसतात. पण सध्यातरी त्यावर तोडगा निघण्याची शक्यता धुसर असल्याचे दिसते.
----------
‘पीएमपी’ला जागेची गरज आहे, हे खरे आहे. काही आगारांमध्ये बस उभ्या करायलाही जागा नाही. त्यासाठी दोन्ही महापालिकांकडे पाठपुरावा सुरू आहे. वाघोली, बाणेर, रावेत, मोशी,कोंढवा आदी भागातील जागा मिळण्याची मागणी आहे. त्यातील काही जागा पुढील काही दिवसांत मिळण्याची आशा आहे.
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
--------------
देखभाल-दुरूस्तीवर परिणाम
आगारांमध्ये प्रामुख्याने बसच्या देखभाल-दुरूस्तीची दैनंदिन कामे चालतात. रात्रीच्यावेळी सर्व बस आल्यानंतर चालकांकडून दिवसभरात बसमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींची लेखी माहिती दिली जाते. त्यानुसार रात्री तंत्रज्ञ या बसची पाहणी करून दुरूस्ती करतात. मात्र, सध्या आगारांमध्ये जागेअभावी देखभाल-दुरूस्ती करण्यातही अडचणी येत असल्याची माहिती एका आगारातील वरिष्ठ अधिकाºयाने दिली. बस दुरूस्त केल्यानंतर त्याची चाचणी घेण्यासाठीही बस बाहेर काढणे शक्य होत नाही. तेवढी जागाही आगारात मिळत नाही. त्यामुळे अनेकदा तांत्रिक दोष तसेच राहण्याची भिती असते. सकाळी चालकाने बस मार्गावर नेल्यानंतर त्यातील दोष समोर येतात, असेही संबंधित अधिकाºयाने स्पष्ट केले.
..........
आगारनिहाय बससंख्या
स्वारगेट - १७०
न.ता.वाडी - १९७
कोथरुड - १९६
कात्रज - १४२
हडपसर - १६३
मार्केटयार्ड - ९९
पुणे स्टेशन - १३८
शेवाळवाडी - ९२
बालेवाडी - ८४
निगडी - ११२
पिंपरी - १५९
भोसरी - ७१
-----------------
एकुण - १६२३