जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या; अन्यथा रिंगरोड रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:04+5:302021-05-29T04:10:04+5:30
पुणे : आधी खडकवासला धरण, नंतर एनडीएसाठी आणि आता रिंगरोडसाठी आमच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. आधीच अल्पभूधारक झालो ...
पुणे : आधी खडकवासला धरण, नंतर एनडीएसाठी आणि आता रिंगरोडसाठी आमच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. आधीच अल्पभूधारक झालो आहोत, रिंगरोडसाठी जमीन दिल्यास आम्ही भूमिहीन होणार आहे. आमचा ऐतिहासिक वारसा नष्ट करणार आहात का, आमच्या जमीन घेणार असाल चारपट पैसे नको, तर बदल्यात जमिनीच द्या, अन्यथा रिंगरोड रद्द करा, अशी मागणी मांडवी बुद्रुकच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
या शेतकऱ्यांमध्ये गोपाळ पायगुडे, दत्तात्रय पायगुडे, श्रीपती नाना पायगुडे, विलास पायगुडे, शंकर पायगुडे, चंद्रकांत लिमये, अक्षय पायगुडे, संतोष पायगुडे आणि गणेश पायगुडे आदींचा समावेश आहे.
मांडवी बुद्रुक गावात रिंगरोड हा राजकीय हेतूने वळवण्यात आला आला आहे. माजी खासदार आणि अभिनेत्याचे फार्महाऊस वाचवण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचा थेट आरोप रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे.
---
कोट
सन २०१६ च्या रिंगरोड आखणीनुसार मालखेडवरून मुठा नदीवर मोठा पूल बांधून सांगरूणमार्गे कातवडी, बहुलीमार्गे जात होता. मात्र, आता राजकीय हेतूने यात बदल केला आहे. मुळात ११० मीटरचा रोड सरळ रेषेत असावा लागतो. जड वाहतूक, कंटेनर ही वळणे अत्यंत धोकादायक असणार आहे. वडगावच्या पुलावर जसे वारंवार अपघात होत आहेत, तसे भविष्यात मांडवीत अपघात होण्याचा धोका आहे.
- गोपाळ रामचंद्र पायगुडे, शेतकरी
----
ऐतिहासिक वारसा नष्ट होणार?
मुठा खोऱ्यातील पायगुडे सरदार आणि मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर यांचा साडेतीनशे वर्षांचा शिवकालीन इतिहास आहे. या रिंगरोडमुळे तो पुसला जाण्याचा धोका आहे. खडकवासला धरण, एनडीएला दिलेल्या जमिनीमुळे आमच्याकडे आता अल्प जमिनी राहिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला समान भाव किंवा चारपट पैसेही नको, त्याऐवजी जमिनीच्या बदल्यात जमिनीच द्या, अन्यथा तत्काळ येथील रिंगरोड रद्द करा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
-----
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
* आम्ही आधीच अल्पभूधारक आहोत, आम्हाला चारपट पैसे नको, तर जमिनीच द्या.
* मराठा आरक्षण रद्द झाल्याने आमच्या वारसांना पुनर्वसन कायद्याखाली शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
* सन २०१६ ची रिंगरोड आखणी बदलली आहे. त्याची चौकशी करावी. तसेच कायदेशीर कारवाई करून मांडवीतील रिंगरोड रद्द करावा.