शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा १९ मार्चला मुंबईत आंदोलन, तुपकरांचा राज्य सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:47 IST2025-03-04T09:46:51+5:302025-03-04T09:47:44+5:30
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले, तरी त्यांना गुडघे टेकायला लावू

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा १९ मार्चला मुंबईत आंदोलन, तुपकरांचा राज्य सरकारला इशारा
पुणे: क्रांतिकारी शेतकरी संघटनेची पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि. ३) पुण्यात पार पडली. यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला इशारा देत दि. १८ मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा, अन्यथा दि. १९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू, असा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले, तरी त्यांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही तुपकर यांनी दिला. यावेळी राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यभरातून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ, तसेच तरुण शेकडो शिलेदार बैठकीसाठी पुण्यात आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेची रूपरेषा, भूमिका आणि आगामी काळातील उद्देशाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही कारभारावर तुफान हल्ला चढवला. उत्पादन खर्चाएवढाही भाव नसल्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात येऊन ठेपला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, गजानन अहमदाबादकर, राजकुमार कसबे, राजाभाऊ देशमुख, अंबादास कोरडे, लक्ष्मण मोरे, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, चंद्रशेखर गवळी, भगवान शिंदे, सत्तार पटेल, ज्ञानेश्वर टाले, नारायण लोखंडे यांच्यासह राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘किसान आर्मी’ची घोषणा
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जशी इंग्रजांच्या काळात पत्री सरकारची स्थापना केली होती, त्याच धर्तीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ‘किसान आर्मी’ तयार करणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत तुपकर यांनी केली. ही किसान आर्मी ठोका-ठोकीचे काम करणार आहे. शेतकऱ्यांची सक्तीची वसुली करणारे बँक अधिकारी, शेतकऱ्यांची वीज तोडणारे, शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना, तसेच गुंड, मुजोर नेते यांना झाेडपून काढण्यासाठी किसान आर्मीची टीम गावागावात काम करेल, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.