मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्वाची संधी द्या ; सर्वपक्षीय नेत्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 04:47 PM2020-06-11T16:47:27+5:302020-06-11T17:01:05+5:30
गेल्या ६४ वर्षात विधानपरिषदेवर एकदाही प्रतिनिधित्व नाही
पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे इंग्रजांनी गुन्हेगारी जमातीचा ठपका ठेवल्याने हा समाज विकासापासून वंचित राहिला. १९५६ पासून विधानपरिषद अस्तित्वात आल्यापासून आजवर समाजाला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे समाजामध्ये रोष आणि आक्रोश आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा द्वितीय क्रमांकाचा मातंग समाज आहे. त्याला दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. त्यामुळे समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सांगितले.
विविध पक्ष, राजकीय संघटनांमध्ये काम करणाऱ्या मातंग समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन याविषयी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप, आरपीआयचे मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, भाजपाचे बापू कांबळे, लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे, नगरसेवक अविनाश बागवे आदी उपस्थित होते.
मातंग समाजातील महापुरुष साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढ्यात अतिशय मोलाचे योगदान दिले. या समाजात आजपर्यंत अनेक साहित्यिक, कलावंत, खेळाडू तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात असंख्य नामवंत लोक होऊन गेले परंतु राज्यपाल नामनिर्देशित सदस्यत्वासाठी मातंग समाजातील या प्रज्ञावंतांचा विचार करण्यात आलेला नाही.
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आघाडी सरकारमधील कोणत्याही पक्षाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यामुळे मातंग समाजात नाराजीचा सूर आहे.
अनुसूचित जातीतील इतर जातींना विधानपरिषदेत अनेकदा संधी देण्यात आली. परंतु, आजतागायत विधानपरिषदे सारख्या या महत्त्वाच्या असलेल्या वरिष्ठ सभागृहात मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही. प्रत्येक वेळी मातंग समाजाच्या वाट्याला निराशाच येते. त्यामुळे राज्य स्तरावर समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोट बांधली असून यावेळी समाजाला संधी देण्याची मागणी करण्यात आली. प्रास्ताविक हातागळे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.
-------------------
मातंग समाज अशिक्षित, अज्ञानी आणि अंधश्रद्धाळू आहे. कष्टकरी आणि प्रामाणिक असलेल्या या समाजाला योग्य संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रगतीला गती मिळू शकेल. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष असल्याने समाजाला प्रतिनिधित्व देऊन समाजाचा सन्मान करावा. ही समाजाच्या सन्मानाची लढाई आहे.
- सुभाष जगताप, नगरसेवक