पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:45+5:302021-07-26T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संसाराचा गाड्याची पती-पत्नी हे दोन्ही चाके असतात, असे म्हटले जाते. पण ते केवळ नावालाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संसाराचा गाड्याची पती-पत्नी हे दोन्ही चाके असतात, असे म्हटले जाते. पण ते केवळ नावालाच असल्याने समाजातील विवाहितांच्या तक्रारीकडे पाहिल्यावर म्हणावेसे वाटते. हुंडा प्रथेबाबत कितीही कडक कायदे केले तरी गरिबांपासून उच्चशिक्षितांपर्यंत अजूनही लग्नात हुंडा घेतला जातो. फक्त आता त्याचे स्वरूप बदलले आहे.
पूर्वी रोख स्वरूपात हुंडा घेतला जायचा. आता मुलगा काय करतो, त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारे हुंडा घेतला जातो. त्यात प्रामुख्याने कार, दुचाकी, फ्लॅट घेण्यासाठी पैसे असे स्वरूप असते. त्याबरोबर लग्नात घराला लागणारा सर्व संसारोपयोगी साहित्याची मागणी केली जाते.
अशिक्षितापासून उच्चशिक्षितांपर्यंत
हुंड्याचे हे सत्र अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत असते. सध्या दोघेही नोकरी करीत असतात. त्यामुळे सुनेच्या पगारापोटी दरमहा भरभक्कम हुंडा लग्नानंतर कायमच घरात येणार असतो. असे असले तरी लग्नात मुलीकडच्यांनी मुलाची, त्याच्या नातेवाईकांची हौसमौज पुरविली पाहिजे, ही मागणी अजूनही कायम आहे. काही जणच आता लग्नाचा खर्च निम्मा निम्मा वाटून घेतात. हा अपवाद वगळता अजूनही लग्नात वधूपक्षाकडे मागणे हा हक्क असल्याचे समजले जाते.
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
आता हुंडा मागण्याची पद्धत काहीशी बदलली आहे. आम्हाला काही नको, असे म्हणून मुलीच्या अंगावर इतक्या तोळ्याचे दागिने घाला, अशी मागणी केली जाते. त्याशिवाय मुलगा सरकारी नोकरीत आहे. त्याच्या वरच्या कमाईचे आकडे सांगून हातचे स्थळ जाऊ नये, असे वाटत असेल, तर कार, बंगल्यासाठी मदत करा, अशी मागणी होते.
रिक्षा घेण्यासाठी, जमीन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगून छळ केला जातो. लग्नात मानपान दिला नाही. हुंडा कमी दिला, अशा कारणावरून लग्नानंतर विवाहितेचा छळ केला जातो. बहुतांश वेळा लग्न मोडले जाऊ नये म्हणून विवाहित महिला तक्रार करायला पुढे येत नाही. अगदीच नाईलाज झाल्यावर त्या महिला साहाय्य कक्षाकडे, पोलिसांकडे धाव घेतात.
नवी पिढी बदलतेय..
लग्न हे दोन जीवांचे मिलन म्हटले जाते. मग त्यात व्यवहार कशाला आणायचा. मुलाला शिकवले ते पालकांनी त्यांचे कर्तव्य केले. त्याची वसुली दुसऱ्या घरातून येणाऱ्या मुलीच्या आईवडिलांकडून कशाला करायची.
तरुण
.........
लग्नात हुंडा घेऊ नये असे माझे मत आहे. मात्र, मुलीच्या घरातील परिस्थिती चांगली असेल व त्यांना आपल्या मुलीच्या चांगल्या संसारासाठी ते काही देऊ इच्छित असेल तर घेण्यास काय हरकत आहे.
तरुण
हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
जुलै २०२० - १३३
जुलै २०२१ - १५६